'आईचा इमोशनल व्हॉइस ओव्हर कानावर पडला अन्..'; भरकार्यक्रमात जान्हवीला आला होता पॅनिक अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:22 PM2024-05-23T14:22:44+5:302024-05-23T14:24:02+5:30
Janhvi kapoor: जान्हवी सध्या तिच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने घडलेला किस्सा सांगितला.
जान्हवी कपूर हे नाव बॉलिवूडसाठी नवीन नाही. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीने (janhvi kapoor) इंडस्ट्रीत पदार्पण केलं. धडक हा जान्हवीचा पहिला सिनेमा. या सिनेमातून जान्हवीने चाहत्यांची मनं जिंकली. परंतु, तिचं हे यश पाहायला श्रीदेवी मात्र तिच्यासोबत नव्हती. श्रीदेवीचं निधन हा इंडस्ट्रीसह सगळ्यांनाच धक्का होता. अलिकडेच जान्हवीने तिच्या आईच्या निधनावर भाष्य केलं. श्रीदेवीला श्रद्धांजली वाहत असतांना जान्हवीला पॅनिक अटॅक आला होता.
जान्हवी सध्या तिच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. जान्हवी या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यात अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका कार्यक्रमात श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिल्यानंतर घडलेला किस्सा सांगितला.
"मी एका डान्स शोमध्ये गेले होते आणि मम्माच्या (श्रीदेवी) निधनानंतर बरोबर एक महिन्यानंतर हा किस्सा घडला होता. मी धडकचं प्रमोशन करत होते आणि मला आईची आठवण येणार नाही याची माझी टीम पुरेपूर काळजी घेत होती. परंतु, या शोमध्ये ते आईला श्रद्धांजली वाहणार आहेत हे आम्हाला सांगण्यात आलं नव्हतं. एका इमोशनल व्हॉइस ओव्हरसोबत आईची सगळी गाणी ऑडिओ-व्हिज्युअलसोबत प्ले केली आणि लहान लहान मुलं आईला श्रद्धांजली वाहू लागले", असं जान्हवी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यांनी जे सादर केलं होतं ते खरंच खूप छान होतं पण त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या या सगळ्यासाठी तयार नव्हते. मला श्वास घेता येईना, मी जोरजोरात हमसून हमसून रडायला लागले. मी स्टेजवरुन खाली उतरले आणि धावत माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले. मला पॅनिक अटॅक आला होता. पण, शोच्या मेकर्सने सगळे सीन कट केले आणि फक्त माझा टाळी वाजवतांनाचे कट्स ठेवले. ज्यावेळी हा एपिसोड टेलिकास्ट झाला त्यावेळी लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली की, खरंच हिला काहीच फरक पडला नाहीये का? पण सत्यपरिस्थिती या सगळ्यापेक्षा खूप वेगळी होती."
दरम्यान, फेब्रुवारी २०१९ मध्ये वयाच्या ५४ व्या श्रीदेवीचं निधन झालं. दुबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. जुलैमध्ये जान्हवीचा पहिला सिनेमा रिलीज होणार होता. परंतु, त्यापूर्वीच फेब्रुवारीमध्ये श्रीदेवीची प्राणज्योत मालवली.