Janhvi Kapoor : “मी त्याच लायकीची आहे...”; 5 वर्षांनंतर आई श्रीदेवीच्या निधनावर बोलली जान्हवी कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:12 PM2023-03-06T13:12:11+5:302023-03-06T13:13:26+5:30
Janhvi Kapoor : एका मुलाखतीत जान्हवी तिच्या आईच्या निधनाबद्दल बोलली. त्या दु:खातून ती कशी सावरली आणि त्यावेळी तिच्या मनात कोणत्या भावना होत्या, याबद्दल तिने सांगितलं.
बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची लेक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीचा डेब्यू झाला. पण तिचा पहिला सिनेमा तिच्या आईला अर्थात श्रीदेवींना बघता आला नाही. लेकीचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच श्रीदेवींचं निधन झालं. आई गेल्यानंतर जान्हवीचं अख्खं आयुष्यच बदललं. तिने कामात स्वत:ला झोकून दिलं. नुकत्याच एका मुलाखतीत जान्हवी तिच्या आईच्या निधनाबद्दल व्यक्त झाली. त्या दु:खातून ती कशी सावरली आणि त्यावेळी तिच्या मनात कोणत्या भावना होत्या, याबद्दल तिने सांगितलं.
बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी माझी आई गमावली, त्यापेक्षा मोठं दु:ख दुसरं काहीही नव्हतं. जणू हृदयात मोठं भोक पडलं होतं. ती अत्यंत दु:खद घटना होती. माझं हृदय तुटलं होतं. त्यावेळी एक विचित्र भावना माझ्या मनात होती. मला माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी सहज मिळाल्या, सगळी सुखं, सगळा ऐशोआराम, कदाचित त्याची भरपाई म्हणून माझ्यासोबत इतकं वाईट झालं होतं, अशी विचित्र भावना मनात सारखी येत होती. काहीतरी खूप वाईट घडलंय आणि कदाचित मी याच लायकीची आहे, असं मला वाटत होतं. ती एक विचित्र मुक्ततेची भावना होती.”
आईच्या निधनाच्या धक्क्यातून कशी सावरली? हेही तिने सांगितलं. .“ आई गेल्यानंतर मी स्वत:ला कामात बिझी करून घेतलं आणि सगळं काही पुसट झालं होतं. आई गेल्याचा महिना माझ्यासाठी अत्यंत धूसर आहे आणि त्यानंतरचा बराच काळसुद्धा असाच आहे. काहीही स्पष्ट नाही. त्यातलं मला काही आठवेल असं वाटत नाही,” असं ती म्हणाली.
श्रीदेवी यांचं निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत झालं. त्या 54 वर्षांच्या होत्या. भाचा मोहीत मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. यादरम्यान बाथटबमध्ये बुडून त्यांचा निधन झालं होतं.आईच्या निधनानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर पूर्णपणे खचली होती.