जस्सी गिलने ह्या चित्रपटासाठी गिरवले मंदारीन भाषेचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 14:53 IST2018-08-01T14:52:00+5:302018-08-01T14:53:28+5:30
'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटात जस्सीने चीनमध्ये राहणाऱ्या पंजाबी तरूणाची भूमिका साकारली आहे.

जस्सी गिलने ह्या चित्रपटासाठी गिरवले मंदारीन भाषेचे धडे
कलाकार एखादी भूमिका वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. आपल्या भूमिकेसाठी कोणी वजन वाढवतात तर कोणी घटवतात. तर कुणी बाल्ड लूक करतात तर कोणी भाषेचे प्रशिक्षण घेतात. गायक जस्सी गिल 'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने चीनमधील मंदारीन भाषेचे धडे गिरवले आहेत.
इरॉस एण्टरनॅशनल आणि कलर यलो प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'हॅप्पी फिर भाग जायेगी' हा चित्रपट 'हॅप्पी भाग जायेगी'चा सीक्वल आहे. गायक म्हणून प्रसिद्ध असलेला जस्सी पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. 'हॅप्पी फिर भाग जायेगी' चित्रपटात जस्सीने चीनमध्ये राहणाऱ्या पंजाबी तरूणाची भूमिका साकारली आहे. या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी जस्सीने पंधरा दिवस मंदारीन भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे.
मंदारीन शिकण्याच्या अनुभवाबद्दल जस्सी म्हणाला की, 'मंदारीन शिकणे खूप आव्हानात्मक होते. त्यामुळे ही भाषा बोलणे दूरच राहिले. सुरूवातीला ही भाषा समजून घ्यायला खूप कठीण गेले. मी शब्दांचा उच्चार योग्य होण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी इंग्रजी सबटायटल्ससोबत मंदारीन भाषेतील काही व्हिडिओ पाहिले. मंदारीन शिकल्यानंतर चित्रीकरणापूर्वी मी उच्चारांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे काम सोपे झाले. मला पंजाबी चित्रपटात काम करायला आवडते. बॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. त्यामुळे मी खूप खश आहे. आपल्या गाण्यातून भुरळ पाडल्यानंतर जस्सी गिल रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ पाडेल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.'