एका फ्रेंच मुलीच्या प्रेमात पडले होते जावेद अख्तर; थेट लग्नाची घातली होती मागणी, स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:33 PM2023-10-29T12:33:00+5:302023-10-29T12:36:12+5:30
नुकतेच एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे.
जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध लेखक तसंच गीतकारही आहेत. त्यांचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत. आता जावेद अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. जावेद अख्तर व अभिनेत्री शबाना आझमी यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. पण, शबाना यांना भेटण्याआधी जावेद अख्तर हे एका फ्रेंच मुलीच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी तिला लग्नासाठी प्रपोजही केले होते.
'एकदा त्याग चित्रपटाच्या सेटवर जोसैन नावाची एक फ्रेंच मुलगी भेटली होती, पहिल्या नजरेतच मी प्रेमात पडलो. काही काळानंतर आमची मैत्री झाली. कालांतराने नातं खूप घट्ट झाले. एके दिवशी मी जोसेनला लग्नासाठी प्रपोजही केलं होतं. पण, तिला परत फ्रान्सला जावं लागलं', असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे जोसेनला मायदेशी परतण्यासाठी जावेद यांनी सर्व व्यवस्था केली होती.
जावेद यांनी मुलाखतीत पुढे सांगितलं की, '38 वर्षांनंतर मुंबईतील काला घोडा फेस्टिव्हलमध्ये आम्ही पुन्हा भेटलो. मी शबानासोबत मुंबईतील काला घोडा फिल्म फेस्टिव्हलला गेलो होतो. आम्ही दोघंही स्टेजकडे जात असताना मागून फ्रेंच उच्चारातला आवाज आला, जावेद. तिला पाहून मी म्हणालो – जोसेन? मग आमचा संवाद झाला. तिने मला सांगितले की ती पॅरिसमध्ये तिच्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते आणि तिला तीन मुली आहेत'.
जावेद अख्तर यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. अंदाज, जंजीर, डॉन (1978), दिल चाहता है, दीवार,शोले, सागर (1985),सिलसिला, सीता और गीता या चित्रपटाच्या पटकथा जावेद अख्तर यांनी लिहिल्या आहेत. तर 'कल हो ना हो', 'वेक अप सिड', 'वीर-जारा' आणि 'लगान' यांसारख्या चित्रपटासाठी जावेद यांनी गाणी लिहीले आहे. जावेद अख्तर यांनी हिंदी सिनेमांना असे अजरामर संवाद दिले जे आजही कोणी विसरू शकलेलं नाही. पुढची अनेकवर्षही त्यांचे हे संवाद बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर राहतील यात काही शंका नाही.