वयाच्या ५२ व्या वर्षीही का अविवाहित आहे झोया? वडील जावेद अख्तर यांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:21 IST2025-04-04T18:20:10+5:302025-04-04T18:21:02+5:30
झोया अख्तरने अजून लग्न का केलं नाही?

वयाच्या ५२ व्या वर्षीही का अविवाहित आहे झोया? वडील जावेद अख्तर यांनी सांगितलं कारण
बॉलिवूडमधील ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची दोन्ही मुलं इंडस्ट्रीत आहेत. फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांनी इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फरहान अख्तर अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, गायक, संगीतकार अशी बहुगुणी ओळख असलेला आहे. तर झोया अख्तर यशस्वी दिग्दर्शिका आहे. फरहानने काही वर्षांपूर्वीच शिबानी दांडेकरसोबत दुसरं लग्न केलं. तर दुसरीकडे त्याची बहीण झोया मात्र वयाच्या ५२ व्या वर्षीही अविवाहित आहे. यामागचं कारण काय याचा जावेद अख्तर यांनी नुकताच खुलासा केला.
अलायंस युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जावेद अख्तर म्हणाले,"मी माझ्या मुलांना सांगितलं होतं की जर तुम्हाला खात्री नसेल की तुम्ही कोणासोबत लग्न करु शकता तोवर लग्न करु नका. तुम्ही मला सांगा की तुम्ही पुढच्या महिन्यात अमुक तारखेला लग्न करणार आहात आणि पुढच्या दिवशी रिसेप्शन ठेवा तर मी तसं करेन. पण मी तुमच्यासाठी जोडीदार शोधणार नाही. कारण कोणीही व्यक्ती पार्टनर शोधण्यात चूक करु शकतो. त्यामुळे काही चूक होणरा असेल तर ती तुम्हीच करा, मी नाही. बस तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती शोधा आणि तुमचंही तिच्यावर प्रेम असायला हवं. फरहानने माझं म्हणणं इतकं मनावर घेतलं होतं की खरोखरंच त्याने पुढच्या महिन्यात लग्न करत असल्याचं सांगितलं. मी त्याची पहिली पत्नी अधुनाला त्यांच्या लग्नाच्या दोन दिवस आधी भेटलो होतो. तुला नक्की खात्री आहे ना? तू तुझा पहिला सिनेमा करत असतानाच लग्नाचा निर्णय घेत आहेस. तेव्हा त्याने आपण विचारपूर्वक निर्णय घेत असल्याचं सांगितलं."
माझी मुलगी झोयाबद्दल सांगायचं तर तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. मलाही तिच्या या निर्णयाचा प्रॉब्लेम नाही. तिचा हा निर्णय बदलवेल असा व्यक्ती तिच्या आयुष्यात येत नाही तोवर ती लग्न करणार नाही. आजपर्यंत तिला कोणी तशी व्यक्ती मिळाली नाही. पण ती खूश आहे. तिचं छान काम सुरु आहे. चांगले मित्र आहेत. त्यामुळे तिचं आयुष्य चांगलं सुरु आहे."
झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'दिल धडकने दो', 'गली बॉय', 'लक बाय चान्स', 'लस्ट स्टोरीज' आणि 'द आर्चीज' सारखे काही सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तिचे सिनेमे कायम हटके असतात त्यामुळे अनेक कलाकार तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात.