"आशुतोष गोवारीकरने माझ्या मर्डरचाच प्लॅन...", जावेद अख्तर यांनी सांगितली 'स्वदेस'ची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:32 IST2024-12-20T17:31:25+5:302024-12-20T17:32:34+5:30
'स्वदेस'मधील त्या गाण्यासाठी जावेद अख्तर यांनी दिलेला नकार, नंतर त्याच गाण्याची झाली स्तुती

"आशुतोष गोवारीकरने माझ्या मर्डरचाच प्लॅन...", जावेद अख्तर यांनी सांगितली 'स्वदेस'ची आठवण
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या लेखणीची ताकद सर्वांनाच माहित आहे. एकापेक्षा एक गाणी त्यांनी लिहिली आहेत. आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) दिग्दर्शित 'स्वदेस' सिनेमातील 'पल पल है भारी' गाणंही त्यांनी लिहिलं होतं. 'रामायण'वर आधारित हे गाणं होतं. मात्र आशुतोष गोवारीकर यांनी जेव्हा जावेद अख्तरांना यावर गाणं लिहायला सांगितलं तेव्हा जावेद अख्तर यांनी थेट नकारच दिला होता. 'माझा मर्डर घडवून आणायचाय का?' अशी जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया होती. धर्माशी निगडीत गाणं असल्याने जावेद अख्तर असं म्हणाले होते.
O2India शी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, "आशुतोष गोवारीकरने मला वाईला बोलवलं. तिथे स्वदेसचं शूट सुरु होतं. ए आर रहमानला एक महिन्यासाठी उपलब्ध नाही त्यामुळे तो जाण्याआधीच त्याला एक गाणं द्यायचं आहे जेणेकरुन तो ते लगेच रेकॉर्ड करेल असं आशुतोषने मला सांगितलं. आशुतोषने मला नरेटिव्ह दिलं आणि मला टेन्शनच आलं. कारण सीन रामायणावर आधारित होता. यामध्ये माता सीतेला रावणाने अशोक वाटिकेत कैद करुन ठेवले असते आणि तो सीतेला श्रीरामाबद्दल प्रश्न विचारत असतो. तेव्हा सीता त्याला सांगते की श्रीराम कसे त्याच्यापेक्षा महान आहेत. मी आशुतोषला म्हणाले, ' तू माझा मर्डर घडवून आणायचं पूर्ण प्लॅनिंग केलं आहेस. हा किती संवेदनशील विषय आहे माहितीये का? रावण श्रीरामावर प्रश्न उपस्थित करत आहे आणि माता सीता उत्तर देत आहे. तू मला यावर गाणं लिहायला सांगत आहेस. जर तू मला हे मुंबईत असतानाच सांगितलं असतंस तर मी रामचरितमानस सारखं एखादं पुस्तक तरी आणलं असतं त्यातून मला कोट घेता आला असता. नेमकं तेव्हाच राम मंदिर मूव्हमेंट जोरात सुरु होती. मी आशुतोषला थेट नकार दिला."
ते पुढे म्हणाले, "या तणावात त्या दिवशी मी लवकर झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि पूर्ण गाणं दोन तासात लिहिलं. गाणं रिलीज झाल्यानंतर एकाने त्याची खूप स्तुती केली आणि म्हणाला की जावेद अख्तर यांनी तुलसीदास यांचं वाक्य घेतलं. खरंतर मला हे तुलसीदास यांचं वाक्य आहे हे माहित नव्हतं. आजपर्यंत मी हाच विचार करतो की कदाचित लहानपणी कधीतरी मी ते ऐकलं असावं कारण मी रामलीला खूप पाहायचो. किंवा मग रावणासोबत अशाच पद्धतीने शाब्दिक वाद होऊ शकतो म्हणून मीही हेच वाक्य लिहिले."