Jhund Movie Review : झोपडपट्टीतली गँग नव्हे हा तर आहे टॅलेंटचा 'झुंड'
By तेजल गावडे | Published: March 2, 2022 02:08 PM2022-03-02T14:08:44+5:302022-03-02T14:10:26+5:30
'पिस्तुल्या', 'फॅन्ड्री', 'नाळ' आणि 'सैराट' अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हिंदी चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे. त्यांचा हिंदी चित्रपट 'झुंड' (Jhund Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे.
कलाकार - अमिताभ बच्चन, छाया कदम, किशोर कदम उर्फ सौमित्र, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, सोमनाथ अवघडे
दिग्दर्शक - नागराज मंजुळे
कालावधी - २ तास ५६ मिनिटं
स्टार - चार स्टार (****)
चित्रपट परीक्षण - तेजल गावडे
'पिस्तुल्या', 'फॅन्ड्री', 'नाळ' आणि 'सैराट' अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हिंदी चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे. त्यांचा हिंदी चित्रपट 'झुंड' (Jhund Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहेत. 'झुंड नहीं ये टीम है...' ही चित्रपटाची टॅगलाइनच बरेच काही सांगून जाते. समाजातील उपेक्षित आणि वंचितांमधील टॅलेंटला प्रकाशझोतात आणून त्यांच्या प्रश्नांना चित्रपटातून अधोरेखित करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या कथेची सुरूवात होते ती झोपडपट्टीतल्या गलिच्छ गल्ल्या, नशा, लूटमार आणि दारूच्या व्यसनात अधीन झालेल्या युवकांपासून. एक दिवस झोपडपट्टीच्या शेजारी असणाऱ्या कॉलेजमधील रिटायर्ड होणारे स्पोर्ट्स प्रोफेसर विजय बोराडे (अमिताभ बच्चन) झोपडपट्टीतील मैदानात तिथल्या मुलांना डब्ब्यासोबत फुटबॉल खेळताना पाहतात आणि त्यांना त्यांच्यातील टॅलेंटची जाणीव होते. सुरूवातीला विजय बोराडे दररोज ५०० रुपयांचे आमिष दाखवून त्यांना फुटबॉल खेळण्यासाठी मनवतात आणि फुटबॉल या खेळाच्या माध्यमातून ते झोपडपट्टीतील मुलांना नशा, क्राइमसारख्या गोष्टींपासून दूर करून त्यांच्यात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू लागतात. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो की नाही, हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
'झुंड' चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर प्रेरीत होऊन बनवण्यात आला आहे. विजय बरसे हे रिटायर्ड स्पोर्ट्स प्रोफेसर असून त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या असंख्य मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले आहे. इतकेच नाही तर त्यांनी स्लम सॉकर नामक एनजीओदेखील स्थापन केली आहे. या चित्रपटात त्यांच्या प्रेरणादायी कहाणीच्या माध्यमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झोपडपट्टीतल्या असंख्य समस्या दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमीच्या चित्रपटांप्रमाणेच नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरित्या पेलवली आहे. यासोबत त्यांनी या चित्रपटात अभिनयदेखील केला आहे. या चित्रपटाची कथादेखील त्यांच्या लेखणीतून साकार झाली आहे आणि त्यांनी ती खूप छान मांडली आहे. हा चित्रपट आपल्याला शिकवण देतो आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो. चित्रपटाचा पुर्वाध धीम्या गतीने पुढे सरकत असला तरी सुरूवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. तसेच चित्रपटाची लांबी थोडी कमी करता आली असती असे वाटते.
चित्रपटातील काही फ्रेम्स बरेच काही सांगून जातात. जसे की भिंत ओलांडण्यास सक्त मनाई आहे हे स्पोर्ट्स कॉलेजच्या भिंतीवर लिहिलेली सूचना वास्तविकता दर्शविते. कारण भिंतीच्या एका बाजूला कॉलेज आहे, जिथे श्रीमंतांची मुले येतात तर दुसरीकडे झोपडपट्टी आहे. कॉलेज आणि झोपडपट्टीमधील भिंत भारतातील दोन समाजांना वेगळे करण्यासोबतच वाईट गोष्टींवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करताना दिसते. तसेच चित्रपटातून बऱ्याच मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले आहे, ज्यात जाती भेद, महिलांचे हक्क आणि समाजाचा दृष्टीकोण याचा समावेश आहे. चित्रपटातील शेवटचा सीनदेखील बरंच काही सांगून जातो. सैराट चित्रपटाचे सिनेमटोग्राफर सुधाकर रेड्डी यकांटी यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. ही देखील या चित्रपटाच्या जमेची बाजू आहे. तर चित्रपटाला संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. त्यांच्या संगीताने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात विजय बोराडेची भूमिका साकारली आहे. स्पोर्ट्स प्रशिक्षकाच्या भूमिकेतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्याशिवाय या चित्रपटाची जबाबदारी त्यांच्या झुंडवर होती त्या मुलांनीदेखील सुंदर अभिनय केला आहे. बाबूपासून अंकुश (डॉन) सोबत सर्वच मुलांनी झोपडपट्टीतल्या मुलांच्या भूमिकेत जान ओतली आहे. छाया कदम, किशोर कदम उर्फ सौमित्र यांची भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती उत्तमरित्या साकारली आहे.
नागराज मंजुळे आपल्या प्रत्येक चित्रपटातून एक नवीन चेहरा आणतात आणि हा चेहरा सर्वांच्या गळ्यातील ताईत बनतो. मग तो जब्या बनलेला सोमनाथ अवघडे, परश्या असलेला आकाश ठोसर, आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू असो अशी बरेच नावे आहेत. त्याच्या चित्रपटातील या चेहऱ्यांनादेखील त्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच झुंडमध्ये सामील केले आहे. त्यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी त्या मनावर छाप उमटवून जातात. नॉन ग्लॅमरस जगतातील वास्तव दर्शवणारा 'झुंड' पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहा.