जिमी शेरगिलला एका खास व्यक्तीने दिलेली ही भेटवस्तू त्याने आजही ठेवली आहे सांभाळून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 06:00 AM2019-07-13T06:00:00+5:302019-07-13T06:00:02+5:30
जिमी शेरगिल, माही गिल आणि सौरभ शुक्ल द कपिल शर्मा शोमध्ये ‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात जिमी शेरगिल, माही गिल आणि सौरभ शुक्ल उपस्थित राहाणार आहेत. या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात हे कलाकार आपल्या ‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत.
या कार्यक्रमात चित्रपट क्षेत्रातील आपल्या प्रवासाबद्दल बोलत असताना जिमी शेरगिलने गुलजार यांच्या संदर्भातील त्याची आवडती एक गोड आठवण सांगितली, 1996 सालच्या माचिस चित्रपटातील अभिनयाबद्दल गुलजार यांनी त्याची पाठ थोपटली होती असे त्याने सांगितले. कपिल शर्माशी गप्पा मारताना जिमी शेरगिलने सांगितले की, ‘माचिस’ मध्ये काम करत असताना एका विशिष्ट दृश्यातील माझ्या अभिनयाने खुश होऊन गुलजार यांनी कौतुकाने मला एक ऑरेंज कॅन्डी टॉफी दिली होती. मी त्यावेळी या क्षेत्रात नवखा होतो, लहानही होतो. त्यावेळी गुलजार साहेब यांच्यासारख्या दिग्गजाने मला ऑरेंज कॅन्डी इतकी छोटीशी वस्तू देणेही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ती टॉफी माझ्यासाठी इतकी खास होती की मी विचारात पडलो की, मी ती खाऊ कशी?”
जिमी शेरगिलला वाटते की, एक छोटीशी ऑरेंज कॅन्डी टॉफी ही त्याच्या कारकीर्दीतील एक लक्षणीय गोष्ट होती. कारण ती छोटीशी वस्तू गुलजार यांनी त्याला त्याच्या अभिनयावर खुश होऊन दिली होती आणि आपल्या कारकिर्दीतीतल एक खास आठवण म्हणून जिमीने ती टॉफी जपून ठेवली होती. द फॅमिली ऑफ ठाकूरगंजच्या या अभिनेत्याला आपल्या जीवनातील ही आठवण सांगताना भरून आले.
या कार्यक्रमात पुढे जिमीची सहकालाकर माही गिलने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या समोर चार तास नाचल्यानंतर आपल्याला पहिला चित्रपट देव डी कसा मिळाला याचा किस्सा सांगितला. कार्यक्रमात येऊन या कलाकारांनी कपिलच्या टीमसोबत खूप मजा-मस्ती केली आणि त्यांच्या कारकिर्दीतील अनेक रंजक किस्से सांगितले.