ऑस्कर जिंकून भारतात परतलेल्या ज्युनियर एनटीआरला विमानतळावर चाहत्यांनी घेरले, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:52 IST2023-03-15T17:25:49+5:302023-03-15T17:52:02+5:30
'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं नाव लिहित संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर ज्युनियर एनटीआर भारतात परतला.

ऑस्कर जिंकून भारतात परतलेल्या ज्युनियर एनटीआरला विमानतळावर चाहत्यांनी घेरले, व्हिडीओ व्हायरल
एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं नाव लिहित संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. भारताच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्सचा पुरस्कार पटकावत देशाचं नाव उंचावलं. तेलगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) ऑस्कर सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा हैदराबादला परतला. रविवारी रात्री लॉस एंजेलिसमध्ये 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात'RRR मधील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाला तेव्हा अभिनेता तिथे उपस्थित होता. मंगळवारी रात्री ज्युनियर एनटीआर पत्नी लक्ष्मी प्रणतीसोबत विमानतळाबाहेर आला तेव्हा चाहत्यांनी त्याला घेराव घातला.
भारतात परतला ज्युनियर एनटीआर
एका पापाराझीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआरला चाहते आणि मीडियाने घेरलेले दिसत आहे. त्या गर्दीतून आपल्या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी अभिनेत्याला बराचवेळ लागला. त्याच्या गाडीला चाहत्यांनी पूर्णपणे वेढलेले दिसतेय. ऑस्कर जिंकणाऱ्या आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
ज्युनियर एनटीआरने मीडियाशी बोलताना म्हणाला की, मला 'RRR'चा अभिमान आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, तो म्हणाला, 'एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांना ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना पाहणे हा सर्वोत्तम क्षण होता. मला 'आरआरआर'चा अभिमान आहे. 'RRR' ला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी प्रत्येक भारतीयाचे आभार मानू इच्छितो. प्रेक्षकांच्या आणि चित्रपटसृष्टीच्या प्रेमामुळेच हा पुरस्कार मिळू शकला आहे.
'नाटू नाटू' या गाण्यानं ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे. कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.