जोडीदार म्हणून जुहीने का केली जय मेहताची निवड; लग्नाच्या 29 वर्षानंतर सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 04:03 PM2024-02-05T16:03:26+5:302024-02-05T16:03:46+5:30
Juhi chawla: जुही आणि जय मेहता यांच्या वयात बरंच अंतर आहे. त्यामुळे जुहीने त्यांच्यासोबत का लग्न केलं हा प्रश्न अनेकांना पडतो.
९० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुही चावला (juhi chawla) .'इश्क', 'डर', 'कयामत से कयामत तक', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' असे अनेक सुपरहिट सिनेमा जुहीने इंडस्ट्रीला दिले. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या जुहीचा त्या काळी जबदस्त फॅनफॉलोअर्स होता. मात्र, १९८४ मध्ये मिस इंडियाचा खिताब जिंकणाऱ्या जुहीने जय मेहता यांच्यासोबत गुपचूपपणे लग्न केलं. तिच्या लग्नामुळे अनेकांना धक्का बसला होता. इतकंच नाही तर तिने आयुष्याचा जोडीदार म्हणून जय यांची निवड का केली? हा प्रश्नही अनेकांना पडला. या प्रश्नाचं उत्तर जुहीने नुकतंच दिलं आहे.
जुहीने जय मेहता यांच्यासोबत १९९५ मध्ये लग्न केलं. जय यांचं हे दुसरं लग्न असून त्यांच्यात आणि जुहीच्या वयात कमालीचं अंतर आहे. त्यामुळे जुहीला अनेकांनी ट्रोल सुद्धा केलं. इतकंच नाही तर आज सुद्धा तिने त्यांच्याशी लग्न का केलं असा प्रश्न चाहत्यांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर लग्नाच्या २९ वर्षानंतर जुहीने दिलं आहे.
अलिकडेच जुहीने झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये जश्न जुही का या स्पेशल एपिसोडमध्ये तिने हजेरी लावली होती. यावेळी शोमधील स्पर्धकांनी तिच्या अनेक गाण्यांवर ठेका धरला. विशेष म्हणजे एक यातील परफॉर्मन्स पाहून तिने तिची आणि जय यांची लव्हस्टोरी सांगितली.
जुहीने का केलं जयसोबत लग्न?
"लग्न होण्यापूर्वी तो रोज मला पत्र लिहायचा.पण, लग्नानंतर हे सगळं थांबलं.त्या काळात आम्ही एकमेकांना पत्र, कार्ड पाठवायचो. पण, आता ईमेल, व्हॉटसअॅप माध्यमातून सगळं मिळतं. जय आणि मी एका रात्री डिनरला भेटलो होतो. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्या रात्री त्याने मला लाल गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला आणि लग्नाची मागणी घातली. पण, तरी सुद्धा मी त्याला होकार द्यायला एक वर्ष लावलं", असं जुही म्हणाली.
दरम्यान, जय मेहता यांचं जुहीसोबत हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. मात्र, त्यांच्या पत्नीचं निधन झालं. पत्नीच्या निधनाच्या दु:खातून सावरण्यासाठी जुहीने जय यांना खूप मदत केली होती.