‘कच्चा बादाम’ फेम भुबन बड्याकर याच्या कारला अपघात, जाणून घ्या कशी आहे प्रकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:06 AM2022-03-01T10:06:55+5:302022-03-01T10:10:35+5:30
Kacha Badam singer Bhuban Badayakar : ‘कच्चा बादाम’ या गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेला पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विकणारा भुबन बड्याकर याच्या कारला सोमवारी रात्री अपघात झाला.
Kacha Badam singer Bhuban Badayakar : ‘कच्चा बादाम’ या गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेला पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विकणारा भुबन बड्याकर याच्या कारला सोमवारी रात्री अपघात झाला. या अपघातात भुबन जखमी झाला आहे. त्याच्या छातीला आणि शरीराच्या अन्य भागाला दुखापत झाली आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम स्थित सुपर स्पेशॅलिटी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
सेकंड हँड कार चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना भुबनला अपघात झाला. अपघातानंतर लगेच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
भुबन हा पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी या गावचा राहणारा. पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असलेला भुबन शेंगदाणे विकून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भुबननं कच्चा बदाम हे गाणं तयार केलं होतं. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तो दररोज 3-4 किलो शेंगदाणे विकून 200 ते 250 रुपये कमावायचा. लोकांनी शेंगदाणे विकत घ्यावे, यासाठी तो ‘कच्चा बादाम’ हे गाणं गाऊ लागला. एकदिवस त्यांचं हे गाणं कुणीतरी मोबाईलवर रेकॉर्ड केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. यानंतर काय तर काही दिवसांतच हे गाणं तुफान व्हायरल झालं. अगदी त्याचं गाणं आत्तापर्यंत सर्वाधिक व्हायरल झालेलं गाणं ठरलं.
आतापर्यंत अनेकांनी या कॅची ट्यून असलेल्या गाण्याचा वापर करून इन्स्टाग्राम रील्स बनवले आहेत. सेलिब्रिटींनाही या गाण्यानं वेड लावलं. या गाण्यामुळे भुबनला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. अगदी अलीकडे, अभिनेता नील भट्टाचार्यनं अपलोड केलेल्या एका इन्स्टाग्राम रीलमध्ये भुबन त्याच्याच गाण्यावर नाचताना दिसला. गेल्या आठवड्यात कोलकात्यातील पार्क स्ट्रीटमधील समप्लेस एल्स पबमध्ये भुबन लाइव्ह परफॉर्म करताना दिसला.
प्रसिद्ध झाल्यांनंतर त्याने एक सेकंड हँड कार विकत घेतली होती. मात्र ती चालवायला शिकत असतानाच त्याला अपघात झाला.