जया बच्चन यांचा 'तो' सिनेमा, कादर खान यांनी फक्त चार तासात लिहिले डायलॉग; वाचा इंटरेस्टिंग गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 07:30 PM2024-12-04T19:30:00+5:302024-12-04T19:30:02+5:30
कादर खान अभिनेत्यासोबतच उत्तम संवाद लेखकही होते.
अभिनेते, लेखक कादर खान(Kadar Khan) मल्टिटॅलेंटेड कलाकारांपैकी एक होते. व्हिलन असो किंवा कॉमेडी सर्वच भूमिका त्यांनी उत्तमरित्या साकारल्या. कादर खान यांची ओळख अभिनेता म्हणून असली तरी ते लिखाणातही तरबेज होते. त्यांनी २०० पेक्षा जास्त सिनेमांसाठी संवाद लिहिले आहेत. यापेकी एका सिनेमासाठी तर त्यांनी फक्त चारच तासात उत्कृष्ट संवाद लिहिले. सिनेमानेही तुफान यश मिळवलं. कोणता आहे तो सिनेमा?
अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री जया बहादुरी बच्चन यांचा 'जवानी दिवानी' आठवतोय? 1972 साली आलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला होता. सिनेमाचे दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांनी कादर खान यांच्याकडे सिनेमासाठी संवाद लिहिण्याची मागणी केली. तेव्हा कादर खान थिएटर आर्टिस्ट होते. आधी तर त्यांनी नकार दिला मात्र बेदी यांनी आग्रह केल्यामुळे त्यांनी स्क्रीप्ट पाहिली. ही स्क्रीप्ट घेऊन कादर खान मरीन ड्राईव्हवर पोहोचले आणि संवाद लिहिले. पुढच्या तीनच तासात ते बेदी यांच्या ऑफिसमध्ये परत आले. त्यांना बघून नरेंद्र बेदी यांना वाटलं की कादर खान पुन्हा नकारच देणार आहेत. पण जेव्हा कादर खान यांनी कागद पुढे केले तेव्हा बेदींना आश्चर्यच वाटलं. त्यांनी संवाद वाचले आणि कादर खान यांना मिठीच मारली. हा त्यांच्यासाठी नेहमी लक्षात राहणारा क्षण होता. यानंतर कादर खान यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यांच्या संवादांवरच या रोमँटिक सिनेमाने जबरदस्त कमाई केली.
कादर खान यांचे 31 डिसेंबर 2018 ला निधन झाले.अनेक हिट चित्रपटात काम करणाऱ्या कादर खान यांनी अभिनयासोबतच कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अँथनी यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे संवाद लिहिले होते.कादर खान यांनी डाग या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी कुली, होशियार, हत्या यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. नव्वदीच्या तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांनी चित्रपटाप्रमाणेच हाय पडोसी कौन है दोशी, हसना मत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते.