दु:खद! कादर खान यांचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दुस यांचे निधन, कॅनडात घेतला अंतिम श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:05 PM2021-04-01T17:05:20+5:302021-04-01T17:05:46+5:30
Kader Khan's Son Abdul Quddus Death : अब्दुल कॅनडात राहत आणि येथील एअरपोर्टवर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कार्यरत होते.
दमदार अभिनय व विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान (Kader Khan) आज आपल्यात नाहीत. आता त्यांच्या कुटुंबाशी निगडीत एक दु:खद बातमी आली आहे. कादर खान यांचा सर्वात थोरला मुलगा अब्दुल कुद्दुस (Abdul Quddus) यांचे निधन झाले आहे. (Kader Khan's Son Abdul Quddus Death) अब्दुल कॅनडात राहत आणि येथील एअरपोर्टवर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अब्दुल यांच्या निधनाची पोस्ट त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.
31 डिसेंबर 2018 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी कादर खान यांनीही कॅनडातच अंतिम श्वास घेतला होता. बॉलिवूडमध्ये 300 पेक्षा अधिक सिनेमात वेगवेगळ्या भूमिका करणा-या कादर खान यांनी अजरा खानसोबत लग्न केले होते. त्यांना अब्दुल कुद्दुस यांच्याशिवाय अन्य दोन मुलं आहेत. यात अब्दुल कुद्दुस सगळ्यात थोरले होते. त्यांच्या अन्य दोन मुलांची नावं सरफराज व शहनवाज खान अशी आहेत. सरफराज व शहनवाज दोघेही फिल्मी दुनियेत सक्रिय आहे.
सरफराज अभिनेता व निर्माता आहे. सरफराजने 2003 साली सलमान खान स्टारर ‘तेरे नाम’ या सिनेमात काम केले होते. यात त्याने सलमानचा जिगरी यार असलमची भूमिका साकारली होती. 2009 मध्ये प्रदर्शित ‘वॉन्टेड’ या सिनेमातही सरफराजने सलमानच्या मित्राची भूमिका साकारली होती.
कादर खान यांचा सर्वात धाकटा मुलगा शहनवाज यानेही अनेक वर्षे कॅनडात घालवली आहेत. तो दिग्दर्शन, एडिटींग व ग्राफिक डिझाईन क्षेत्रात कार्यरत आहे. सरफराज व शहनवाज यांनी 2012 साली वडिलांसोबत मिळून ‘कल के कलाकार इंटरनॅशनल थिएटर’ सुरु केले होते.