कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; 'या' कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेला होता गायक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:31 AM2024-05-07T11:31:54+5:302024-05-07T11:33:16+5:30
Kailash kher : वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी आत्महत्या करायचाही प्रयत्न केला होता.
'अल्ला के बंदे', 'सैय्या', 'तेरी दिवानी' अशी कितीतरी सुपरहिट गाणी इंडस्ट्रीला देणारा लोकप्रिय गायक म्हणजे कैलाश खेर. त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रत्येक गाणं मनाला भिडतं. त्यामुळे आज ते इंडस्ट्रीतील टॉप १० गायकांपैकी एक आहेत.उत्तम आवाजाच्या जोरावर त्यांनी कलाविश्वात स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी आत्महत्या करायचाही प्रयत्न केला होता.
वयाच्या१४ व्या वर्षी सोडलं घर
कैलाश खेर हे मूळचे दिल्लीचे. लहानपणापासून त्यांना गायक व्हायचं होतं. परंतु, घरातल्यांना ते काही मान्य नव्हतं. त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गाण शिकवणारा गुरु मिळावा यासाठी ते वयाच्या १४ व्या वर्षी घरातून पळाले. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय आणि लोकगीतांचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला ते ऋषिकेश, हरिद्वार येथे राहिले. अनेक रात्री रस्त्यावर काढल्या. परंतु, बराच शोध घेऊनही त्यांना संगीत शिक्षक न मिळाल्यामुळे ते घरी परतले आणि कुटुंबीयांच्या सल्ल्याने बिझनेस सुरु केला.
आत्महत्येचा केला प्रयत्न
कैलाश खेर यांनी ANI ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी अनेक खुलासे केले. उदरनिर्वाह करण्यासाठी मी वेगवेगळी काम करुन पाहिली. वयाच्या २०-२१ व्या वर्षी मी दिल्लीत एक्सपोर्टचा बिझनेस सुरु केला. मी जर्मनी हँडिक्राफ्ट्स पाठवायचो. पण, अचानक हा व्यवसाय बुडाला. त्यानंतर मी ऋषिकेशला गेलो. पण, मी प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरत होतो. त्यामुळे मग एक दिवस या सगळ्याला कंटाळून मी गंगा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. पण, एका व्यक्तीने मला वाचवलं.
नैराश्यात गेले होते कैलाश खेर
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने ते मुंबईला आले त्यावेळी ते ३० वर्षांचे होते. त्यावेळीही त्यांना बराच स्ट्रगल करावा लागला. एका मुलाखतीमध्ये त्यांनी या गोष्टीचाही खुलासा केला. "मुंबईत आल्यावरही मला बराच स्ट्रगल करावा लागला. मला सतत असं वाटायचं की गंगा नदीने मला आत्महत्या करण्यासाठी मुंबईतील समुद्राकडे ढकललं आहे. पण, इथे आल्यावर माझ्या एका मित्राने मला मदत केली. प्रचंड मेहनत करुन मी इंडस्ट्रीत माझं स्थान मिळवलं," असं ते म्हणाले.
दरम्यान, तेरी दीवानी, सैंया, चांद सिफारिश, यूं ही चला चल राही, या रब्बा, अर्जियां, पिया घर आएंगे यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी इंडस्ट्रीला दिली. तसंच अल्लाह के बंदे या गाण्यामुळे त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. आज कैलाश खेर एका गाण्यासाठी १० लाख रुपये चार्ज करतात.