या प्रसिद्ध गाडीच्या नावाने ओळखली गेली असती काजोल, तिच्या वडिलांनाच ठेवायचे होते हे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 05:45 PM2021-04-13T17:45:00+5:302021-04-13T17:45:02+5:30
हे नाव काजोलच्या आईला अजिबातच आवडले नव्हते. यावरून तिच्या आई वडिलांची चक्कं भांडणं झाली होती
काजोल नव्वदीच्या दशकातील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. काजोलने तिच्या चित्रपटाच्या प्रवासात आतापर्यंत सहा फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी काजोलने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू 'बेखुदी' होता. काजोल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. काजोलला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, काजोलच्या वडिलांना तिचे नाव काजोल नव्हे तर एका गाडीच्या नावावरून ठेवायचे होते.
काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक होते. तर अभिनेत्री तनुजा ही काजोलची आई आहे. काजोल आणि तनिषा अशा त्यांना दोन मुली असून काजोल त्या दोघींमध्ये मोठी आहे. काजोलच्या वडिलांना तिचे नाव काय ठेवायचे होते हे तिने हेलिकॉप्टर इला या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सांगितले होते.
काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या वडिलांना माझे नाव मर्सडिज ठेवायचे होते. त्यांना हे नाव खूप आवडायचे. मर्सडिज कंपनीच्या मालकाने आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावरूनच या कंपनीचे नाव ठेवले होते तर मी माझ्या मुलीचे नाव मर्सडिज का ठेवू शकत नाही असा त्यांनी माझ्या आईला प्रश्न विचारला होता. हे नाव माझ्या आईला अजिबातच आवडले नव्हते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण यावरून माझ्या आई वडिलांची चक्कं भांडणं झाली होती.
बाजीगर या चित्रपटानंतर काजोलला खऱ्या अर्थाने यश मिळाले. त्यानंतर तिने ये दिल्लगी, इश्क, प्यार किया तो डरना क्या, प्यार तो होना ही था, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. तिचे लग्न अभिनेता अजय देवगण सोबत झाले असून त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुले आहेत.