आता तो पाया पडला तरी...; सलमानच्या सिनेमाचा रिव्ह्यू करणार नाही म्हणणार्या KRKचा युटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:53 PM2021-05-28T14:53:15+5:302021-05-28T14:53:53+5:30
Kamaal R Khan : सलमानने मानहानी दावा ठोकलाच केआरकेची बोबडी वळली होती. आता यापुढे आपण कधीही सलमानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार नाही, असे केआरकेने जाहीर करून टाकले होते. पण आता...
सलमान खानने (Salman Khan) मानहानी दावा ठोकलाच अभिनेता व स्वयंभू समीक्षक कमाल आर खान (Kamaal R Khan) अर्थात केआरकेची बोबडी वळली होती. ‘राधे’ (Radhe: Your Most Wanted Bhai) या सलमानच्या सिनेमाचा निगेटीव्ह रिव्ह्यू देणे केआरकेला भोवले होते. मानहानीची नोटीस मिळताच, आता यापुढे आपण कधीही सलमानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार नाही, असे केआरकेने जाहीर करून टाकले होते. पण आता त्याने घुमजाव करत, पुन्हा एकदा भाईजानला डिवचलेय. त्याचे ताजे ट्विट याचा पुरावा आहे.
या ट्विटमध्ये केआरकेने पुन्हा एकदा नाव न घेता सलमानवर निशाणा साधला.
केआरकेने पुन्हा डिवचले
‘निर्माता-दिग्दर्शकांनी वा चित्रपटाच्या कलाकारांनी म्हटल्याशिवाय मी कुठल्याही सिनेमाचा रिव्ह्यू करत नाही. पण आता एका व्यक्तीने मला लाख विनवण्या करू देत, माझे पाय धरू देत तरीही मी त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रत्येक गाण्याचा रिव्ह्यू करेन. सत्यमेव जयते, जयहिंद’ असे केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटमध्ये केआरकेने सलमानचे नाव घेणे टाळले. पण त्याचा इशारा सलमानकडेच आहे, हे लपून राहिलेले नाही़.
केआरकेने ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमानच्या ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाची प्रचंड खिल्ली उडवली होती. हा सिनेमा पाहून माझी तब्येत बिघडली, असे त्याने या सिनेमाचा रिव्ह्यू देताना म्हटले होते. राधे म्हणजे कोरोनाची तिसरी लाट आहे, असेही तो म्हणाला होता.
म्हणून ठोकला मानहानीचा दावा
‘राधे’चा खराब रिव्ह्यू दिल्यामुळे सलमानने आपल्यावर मानहानीचा दावा ठोकल्याचे केआरकेने म्हटले होते. मात्र सलमानच्या वकीलांनी काल गुरूवारी याबाबत खुलासा करत, मानहानीचा दावा व राधेच्या रिव्ह्यूचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या मानहानी दाव्याचे कारण राधेचा रिव्ह्यू असल्याचे सांगितले जातेय. पण त्या रिव्ह्यूशी या दाव्याचा काहीही संबंध नाही. केआरके सलमानच्या बीइंग ह्युमन ब्रँडला सतत बदनाम करण्याचे प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याच्याविरोधात मानहानी दावा ठोकण्यात आल्याचे वकीलाने स्पष्ट केले होते.