बॉलिवूडमध्ये शिस्त नाही अन् माझ्याकडे इतका वेळ नाही; असे का म्हणाले कमल हासन?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 10:45 AM2018-08-05T10:45:26+5:302018-08-05T10:49:11+5:30
कमल हासन या हरहुन्नरी अभिनेत्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. लवकरच कमल हासन यांचा ‘विश्वरूपम2’ हा चित्रपट रिलीज होतोय.
कमल हासन या हरहुन्नरी अभिनेत्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. लवकरच कमल हासन यांचा ‘विश्वरूपम2’ हा चित्रपट रिलीज होतोय. ‘विश्वरूपम2’ मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या कमल हासन सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याच निमित्ताने एका खासगी वाहिनीशी बोलताना कमल हासन यांनी अनेक मुद्यांवर आपली परखड मते मांडली. हिंदी चित्रपटांपासून ते अभिनय ते नेता बनण्याच्या प्रवासावर विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिलीत. याचदरम्यान बॉलिवूडवर त्यांनी ‘बेशिस्त’ असल्याचा आरोप केला.
होय, बॉलिवूडमध्ये शिस्तप्रियता नाही, असे ते म्हणाले. ‘बॉलिवूडमध्ये शिस्तीचा प्रचंड अभाव आहे, येथे एक चित्रपट बनवायला २ ते ३ वर्षे लागतात. माझे आयुष्य खूप लहान आहे आणि माझ्याकडे इतका वेळ नाहीये. अर्थात गेल्या काही वर्षांत बरेच काही बदलते आहे. हळूहळू का होईना बॉलिवूडमध्येही शिस्त येईल, अशी आशा बाळगतो,’ असे ते म्हणाले. मी आता बॉलिवूडमध्ये काम करू शकेल, असे मला वाटत नाही. कारण मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे आणि आता माझ्या खांद्यावर बरीच मोठी जबाबदारी आहे. राजकारण हे चित्रपटांपेक्षा अधिक धार्मिक व पवित्र काम आहे, असे मी म्हणणार नाही. पण वयाच्या ६३ व्या वर्षी यानिमित्ताने का होईना समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे, असेही कमल म्हणाले.
मी नेहमीच आपले वेगळेपण जपले आहे. एका अभिनेत्याची दुसऱ्यासोबत आणि एका दिग्दर्शकाची दुस-या दिग्दर्शकासोबत तुलना मला मान्य नाही. प्रत्येकाच्या कामाची एक पद्धत असते. आपल्याच चित्रपटांवर वा राजकारणावर उपहासात्मक बोलणे मला जमत नाही. जे आहे ते स्पष्ट आणि ठोस शब्दांत सांगणे हाच माझा स्वभाव राहिला आहे. एक कलाकार आणि देशाचा एक जबाबदार नागरिक या नात्याने माझा दृष्टिकोण, माझी मते ठाम असतात. जे लोकांना विचार करायला भाग पाडतात, असे ते म्हणाले.
कमल हासन यांचा ‘विश्वरूपम2’ येत्या १२ आॅगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.