‘फॅशन’ची १० वर्षे; मधुर भांडारकर घेऊन येत आहेत सीक्वल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 14:00 IST2018-10-30T13:58:19+5:302018-10-30T14:00:28+5:30
आज ‘फॅशन’ आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘फॅशन’ची १० वर्षे; मधुर भांडारकर घेऊन येत आहेत सीक्वल!
मधुर भांडारकर हा बॉलिवूडच्या ‘ट्रेंड सेटर’ दिग्दर्शकांपैकी एक आहे. सन २००८ मध्ये मधुरच्या ‘फॅशन’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. प्रेक्षक, समीक्षक सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. प्रियांका चोप्रा आणि कंगना राणौत या चित्रपटात मुख्य भूमिकेत होत्या. आज मधुरचा ‘फॅशन’ आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. होय, २००८ मध्ये आजच्याच दिवशी ‘फॅशन’ प्रदर्शित झाला होता. ‘फॅशन’ला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मधुरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत जुन्या स्मृतींना उजाळा दिला आहे. एक दशक झाले आहे. पण आजही ‘फॅशन’मुळे मिळालेले प्रेम आणि सन्मानामुळे माझा ऊर भरून येतो. ‘फॅशन’च्या टेक्निकल टीमलाही मी त्यांच्या अद्भूत योगदानासाठी धन्यवाद देईल, असे मधुरने म्हटले आहे.
‘फॅशन’चा सीक्वल बनवण्याचे संकेत मधुरने याआधीच दिले आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वलचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड बघता मधुरने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत ‘फॅशन’चा सीक्वल बनवण्याची संकेत दिले होते. माझ्याकडे ‘फॅशन 2’चा कॉन्सेप्ट तयार आहे. माझ्या डोक्यात एक स्टोरी आहे. मी नेहमीच वास्तववादी चित्रपट बनवू इच्छितो, असे मधुर या मुलाखतीत म्हणाला होता. ‘फॅशन 2’चे काम सध्या अगदीच प्राथमिक स्तरावर आहे. पण लवकरच या चित्रपटाची कथा आणि स्क्रिप्टवर काम सुरू करणार असल्याची माहितीही त्याने दिली होती.
‘फॅशन’मध्ये प्रियांका व कंगनाशिवाय मुग्धा गोडसे, अर्जुन बाजवा, अरबाज खान महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. आता ‘फॅशन’च्या सीक्वलमध्ये कुणा-कुणाची वर्णी लागते, ते बघूच आणि या सीक्वलसाठी व ‘फॅशन’ला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मधुरला शुभेच्छाही देऊ.