कंगना राणौत-जावेद अख्तर वाद संपला! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- "त्यांनी शब्द दिलाय की..."
By देवेंद्र जाधव | Updated: February 28, 2025 14:33 IST2025-02-28T14:33:03+5:302025-02-28T14:33:55+5:30
कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली कायदेशीर लढत आता थांबली आहे. या दोघांमधला वाद कसा मिटला? जाणून घ्या

कंगना राणौत-जावेद अख्तर वाद संपला! अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली- "त्यांनी शब्द दिलाय की..."
गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रकरणाची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. हे प्रकरण म्हणजे जावेद अख्तर-कंगना राणौतमध्ये (kangana ranaut) सुरु असलेला कोर्टाचा खटला. पण दोघांनीही आज एकमेकांसोबतचा फोटो पोस्ट करुन सर्वांनाच सुखद धक्का दिलाय. जावेद अख्तर (javed akhtar) आणि कंगना राणौत यांच्यातील वाद आता मिटला असून कंगनाने जावेद यांच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. काय म्हणाली कंगना? जाणून घ्या.
जावेद अख्तर-कंगनामधील वाद मिटला
कंगनाने सोशल मीडियावर जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करुन खास कॅप्शन लिहिलंय की, "मी आणि जावेद जी यांनी आमच्यातील कोर्टातलं प्रकरणं (मानहानीचा खटला) आता मिटवलं आहे. मध्यस्थी करुन आम्ही आमच्यामधील कायदेशीर लढत आता थांबवली आहे. गीतकार जावेद साब खूप दयाळू आणि उदार मनाचे आहेत. याशिवाय मी जो आगामी सिनेमा दिग्दर्शित करेन त्यासाठी जावेद जी गाणं लिहिणार असल्याचा होकार त्यांनी कळवला आहे."
नेमकं प्रकरण काय होतं?
आज (२८ फेब्रुवारी) कंगना या केससाठी मुंबईतील एका कोर्टात दाखल झाली होती. काही दिवसांपूर्वीच कंगनाला कोर्टात हजर राहण्याची शेवटची संधी दिली होती. तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं होतं. परंतु मध्यस्थी करुन जावेद साब आणि कंगनाने हा वाद कायमचा मिटवला आहे. हे प्रकरण २०१६ चं होतं. ज्यावेळी कंगना-हृतिक रोशन यांच्यातील वाद गाजला होता. तेव्हा जावेद अख्तर यांनी एक मीटिंग बोलावून कंगनाला हृतिकची माफी मागायला सांगितलं होतं.
जावेद अख्तर यांनी माझ्यावर हृतिकची माफी मागण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप करुन कंगनाने तक्रार दाखल केली. पुढे जावेद यांनी कंगनावर मानहानीची केस दाखल केली. अखेर आज या दोघांमधील वादाचा शेवट सुखद झाला असं म्हणता येईल.