अखेर कंगनाचा 'इमर्जन्सी' प्रदर्शित होणार! ४ वेळा बदलली रिलीज डेट, आता 'या' दिवशी थिएटरमध्ये लागणार सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:05 PM2024-11-18T12:05:14+5:302024-11-18T12:06:20+5:30
सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा कंदील दिल्यानंतर 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बॉलिवूडची क्वीन आणि खासदार कंगना रणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते कंगनाच्या या सिनेमाची वाट पाहत आहेत. पण, काही ना काही कारणांमुळे सिनेमाची रिलीज डेट सारखी बदलण्यात येत होती. अखेर सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा कंदील दिल्यानंतर 'इमर्जन्सी'च्या रिलीज डेटबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
'इमर्जन्सी' सिनेमाला काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यानंतर आता कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. खरं तर ऑक्टोबर २०२३ मध्ये कंगानाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणांमुळे 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट बदलण्यात आली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र पुन्हा एकदा 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट बदलण्यात आली. १४ जून २०२४ रोजी सिनेमा रिलीज होणार होता. त्यानंतर पुन्हा तारीख बदलली गेली आणि ६ सप्टेंबरला सिनेमा प्रदर्शित होईल असं सांगितलं गेलं.
कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील कलाकारांनी 'इमर्जन्सी'चं प्रमोशनही सुरू केलं होतं. त्यामुळे ६ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल अशी चाहत्यांना आशा होती. मात्र सेन्सॉर बोर्डमुळे पुन्हा ही आशा फोल ठरली. आता अखेर २०२५मध्ये कंगनाच्या या सिनेमाला मुहुर्त मिळाला आहे. 'इमर्जन्सी' सिनेमा येत्या नवीन वर्षात १७ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
'इमर्जन्सी' सिनेमातून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य करण्यात येणार आहे. १९७५ सालचा आणीबाणीचा काळ यातून दाखविण्यात येणार आहे. कंगना रणौतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. तर श्रेयस तळपदे, भुमिका चावला, अनुपम खेर, सतिश कौशिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.