तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश...! मोदींनी कृषी कायदे मागे घेताच भडकली कंगना राणौत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 11:46 AM2021-11-19T11:46:44+5:302021-11-19T11:47:24+5:30
Kangana Ranaut Reacts To Narendra Modi Decision To Repeal 3 Farm Laws: होय, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मोदी सरकारच्या निर्णयाला दु:खद, लज्जास्पद व अयोग्य म्हटलं आहे.
गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी ठाण मांडून बसले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या कायद्यांविरोधात शेतक-यांचं आंदोलन सुरू होतं. आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. आंदोलक शेतक-यांनी घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरूवात करावी, असं आवाहन त्यांनी केलं. मोदींच्या या घोषणेचं शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांनी स्वागत केलं आहे. पण एक व्यक्ती मात्र मोदींच्या या निर्णयानं चांगलीच भडकली आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut ) मोदी सरकारच्या या निर्णयाला दु:खद, लज्जास्पद व अयोग्य म्हटलं आहे.
मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काहीच क्षणात कंगनाने एक इन्स्टास्टोरी शेअर केली. यात तिने मोदींच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाली कंगना...?
‘दु:खद, लज्जास्पद... अयोग्य... संसदेत बसणा-या लोकांनी निवडून दिलेल्या सरकारऐवजी सस्त्यावर बसणारे लोक कायदे बनवणार असतील तर हा सुद्धा ‘जिहादी’ देश आहे. ज्यांना हे हवंय, त्यांचं अभिनंदन,’ अशा आशयाची इन्स्टा स्टोरी कंगनाने शेअर केली आहे.
कंगना मोदींच्या निर्णयाने संतापली असली तरी बॉलिवूडच्या अनेक अन्य सेलिब्रिटींनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केलं आहे. अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराणा आदींनी मोदींच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. शेतकरी आंदोलनाला पूर्वीपासून पाठींबा देणा-या तापसीने ट्विट करून आनंद साजरा केला आहे. सोनू सूद याने मोदींचे आभार मानत, हा शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.