'लहान वयाच्या मुलासोबत लग्न करणं तर सोडाच.पण..'; विकी-कतरिनाच्या Age gap वर कंगनाची कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:48 PM2021-12-08T13:48:25+5:302021-12-08T13:51:51+5:30
Kangana Ranaut: कलाविश्वात कोणतीही घटना घडली की कंगना त्यावर आपली प्रतिक्रिया देत असते. यावेळीदेखील तिने बॉलिवूड कलाकारांवर बोलण्याची एक संधी सोडलेली नाही.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत(Kangana Ranaut). कलाविश्वात कोणतीही घटना घडली की कंगना त्यावर आपली प्रतिक्रिया देत असते. यावेळीदेखील तिने बॉलिवूड कलाकारांवर बोलण्याची एक संधी सोडलेली नाही. मात्र, यावेळी तिने कोणतंही टीकास्त्र डागण्याऐवजी चक्क कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या कलाविश्वात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्येच कंगनाने या दोघांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. विशेष म्हणजे तिने या पोस्टमध्ये दोघांचंही नाव न घेतला तिचं मत मांडलं आहे.
सध्या सोशल मीडियावर कंगना रणौतची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने अप्रत्यक्षरित्या विकी आणि कतरिना यांच्या वयातील अंतरावर भाष्य केलं आहे. कतरिना आणि विकी यांच्या वयात साधारणपणे ५ वर्षांचं अंतर आहे. कतरिना, विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. सध्याच्या घडीला विकी ३३ वर्षांचा आहे. तर, कतरिना ३८ वर्षांची. परंतु, कतरिनाने वयाने लहान आणि तिच्यापेक्षा कमी यशस्वी अभिनेत्याची पती म्हणून निवड केली. यासाठी कंगनाने त्यांचं कौतुक केलं आहे.
कंगनाने केलं विकी-कतरिनाचं कौतुक
विकी आणि कतरिना ९ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांमध्ये या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यातच कंगनाने एक पोस्ट शेअर करत विकी-कतरिनाचं कौतुक केलं आहे.
"एखाद्या श्रीमंत पुरुषाने त्याच्यापेक्षा वयाने लहान किंवा अगदी कमी वयाच्या मुलीबरोबर लग्न केल्याच्या अनेक घटना आजपर्यंत आपण ऐकल्या आहेत. एखादी स्त्री जर तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त श्रीमंत किंवा यशस्वी असेल तर ही गोष्ट सहसा खपवून घेतली जात नाही. लहान वयाच्या मुलासोबत लग्न करणं तर सोडाच.पण, एका ठराविक वयानंतर लग्न होणंदेखील कठीण आहे. परंतु, आता भारतीय कलाविश्वातील यशस्वी आणि श्रीमंत स्त्रिया हळूहळू या भेदभावाची संकल्पना बदलत आहेत. वर्षानुवर्ष चालत आलेली रुढी तोडत आहेत, हे पाहून खरंच बरं वाटतंय", अशी पोस्ट कंगनाने शेअर केली आहे.
दरम्यान, या पोस्टमध्ये कंगनाने कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही. मात्र, तिची पोस्ट वाचल्यावर तिने तिने अप्रत्यक्षरित्यापणे विकी-कतरिनासाठीच ही पोस्ट लिहिल्याचं दिसून येत आहे. विकी-कतरिना येत्या ९ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
विकी-कतरिनाच्या लग्नात 'या' सेलेब्सची उपस्थिती
या लग्नसोहळ्यामध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. यात कबीर खान, मिनी माथुर, राधिका मदान, सुनील शेट्टी, करण जौहर, नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांसह अनेक दिग्गज कलाकार मंडळ उपस्थित राहणार आहेत.