'इमर्जन्सी' सिनेमाबाबत माझी एक मोठी चूक झाली, कंगना राणौतचा खुलासा; सेन्सॉर बोर्डाने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:03 IST2025-01-09T11:03:20+5:302025-01-09T11:03:40+5:30
दिग्दर्शन करण्याचा निर्णयही चुकला? काय म्हणाली कंगना वाचा...

'इमर्जन्सी' सिनेमाबाबत माझी एक मोठी चूक झाली, कंगना राणौतचा खुलासा; सेन्सॉर बोर्डाने...
खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर तर दमदार आहे. विशेष म्हणजे कंगनाने स्वत: सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. या सिनेमासाठी तिने आयुष्यभराची पुंजी पणाला लावली होती. सेन्सॉर बोर्डाने अनेक दिवस सिनेमाला सर्टिफिकेटच दिलं नव्हतं. पण आता सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान एका मुलाखतीत कंगनाने हा सिनेमा थिएटरमध्ये दिग्दर्शित करणं ही मोठी चूक झाल्याचं वक्तव्य केलं आहे.
कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' खरंतर मागच्या वर्षीच रिलीज होणार होता. मात्र 'केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड(CBFC)'ने सिनेमात अनेक बदल सांगितले. ते बदल केल्यानंतर आात सिनेमा रिलीज होणार आहे. यासंदर्भात न्यूज १८ शोशा ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "मी खूप घाबरले होते. मला तर वाटत होतं की सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करणं हा निर्णयच चुकला आहे. ओटीटीवर रिलीज केला असता तर मला चांगली डील मिळाली असती. सेन्सॉरशिपमधून जावं लागलं नसतं आणि सिनेमातील काही सीन्स कटही करावे लागले नसते. CBFC काय काढेल आणि काय ठेवू देईल याची मला कल्पना नव्हती. मला वाटतं मी सिनेमाबाबतीत अनेक ठिकाणी चुकीचे निर्णय घेतले. सिनेमा दिग्दर्शित करणं ही सुद्धा माझी चूकच झाली. काँग्रेस सरकार नसलं तरी सुद्धा मी या मुद्द्यांना खूप गृहित धरलं."
ती पुढे म्हणाली, "'किस्सा कुर्सी का' असा एक सिनेमा होता. आजपर्यंत तो कोणीही पाहिला नसेल. त्यांनी सिनेमाच्या प्रिंटही जाळून टाकल्या. तसंच आजपर्यंत कोणीही मिसेस गांधींवर सिनेमा बनवला नाही. इमर्जन्सी सिनेमा बघितल्यानंतर आजची पिढीला हे समजेल की त्या कशा होत्या, त्या तीन वेळा पंतप्रधान कशा झाल्या. मला वाटलं मी खूरप सहज हा सिनेमा बनवेल. पण नंतर कळलं की यामध्ये किती आव्हानं आहेत. पण आम्ही लढलो, सगळी कागदपत्र दिले, अनेक प्रांत-समुदायातील लोकांनी सिनेमा पाहिला आणि ते म्हणाले की या सिनेमाला सर्टिफिकेट न देण्यात काहीच अडचण नाही. दिलं पाहिजे. पण आम्ही CBFC लाही सहकार्य केलं."