आपल्यापासून सत्य लपवले गेले...! कंगना राणौतचे नथुराम गोडसेच्या समर्थनात ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:35 PM2021-01-31T12:35:15+5:302021-01-31T12:35:41+5:30
काय म्हणाली कंगना?
कंगना राणौत आणि तिची टिवटिव थांबायची चिन्हे नाहीत. मुद्दा कुठलाही असो, कंगना बोलणार म्हणजे बोलणार. अलीकडे कंगना शेतकरी आंदोलनावरील ट्वीटमुळे चर्चेत होती. या ट्वीटमध्ये तिने शेतकरी आंदोलनाला कडाडून विरोध केला होता. यामुळे ती ट्रोलही झाली होती. आता कंगनाने नथुराम गोडसेचे समर्थन केले आहे.
शनिवारी (30 जानेवारी) महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला कंगनाने तिच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर नथुराम गोडसेबद्दल एक ट्वीट केले. तिच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ट्वीटमध्ये कंगनाने नथुराम गोडसेचे फोटो सुद्धा पोस्ट केलेत. ‘प्रत्येक कहाणीला तीन बाजू असतात. एक तुमची, एक माझी आणि एक खरी. चांगली कहाणी सांगणारा ना बंधनात असतो, ना काही लपवतो आणि म्हणूनच आपली पाठ्यपुस्तके निरूपयोगी आहेत. पूर्णपणे दिखावा करणारी...’, असे ट्वीट कंगनाने केले.
Every story has three sides to it, yours, mine and the truth ....
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 30, 2021
A good story teller neither commits nor conceals... and that’s why our text books suck ... full of exposition #NathuramGodsepic.twitter.com/fLrobIMZlU
काहींनी कंगनाच्या या ट्वीटचे समर्थन केले आहे तर काहींनी यानिमित्ताने पुन्हा एकदा कंगनावर टीकास्त्र सोडले आहे. कंगनाच्या मते, आपल्याला जो इतिहास शिकवला जातोय, तो वास्तवापासून खूप दूर आहे. पूर्णपणे चुकीचा आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘थलायवी’ आणि ‘धाकड’ सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ‘तेजस’ या सिनेमातही ती मुख्य भूमिका साकारणार आहे.
साकारणार इंदिरा गांधी!
This is a photoshoot about iconic women I did in the beginning of my career, little did I know one day I will get to play the iconic leader on screen. https://t.co/ankkaNevH2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 29, 2021
कंगना पुन्हा एकदा पॉलिटिकल चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसेल. कंगनाने अद्याप या चित्रपटाचे नाव सांगितलेले नाही. मात्र, हा चित्रपट इंदिरा गांधींची बायोपिक नसेल, तसेच या चित्रपटात अनेक मोठे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील, असे तिने म्हटले आहे. थलाइवी नंतर कंगनाचा हा दुसरा पॉलिटिकल चित्रपट असेल. चित्रपटासंदर्भात बोलताना कंगना म्हणाली, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, ना इंदिरा गांधीं यांचा बायोपिक होणार आहे. या चित्रपटात आणखीही काही दिग्गज कलाकार दिसतील. सध्या आम्ही प्रोजेक्टवर काम करत आहोत. तसेच स्क्रिप्ट फायनल स्टेजला आहे. ही एक ग्रँड पिरियड फिल्म आहे. यामुळे आजच्या पिढीला भारताची राजकीय स्थिती समजून घेण्यास मदत होईल.