महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे का वागताय?; कंगनाचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By कुणाल गवाणकर | Published: October 26, 2020 09:53 AM2020-10-26T09:53:48+5:302020-10-26T10:04:07+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला कंगनाकडून जोरदार प्रत्युत्तर

kangana ranaut slams cm uddhav thackeray for his dasara melava speech | महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे का वागताय?; कंगनाचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे का वागताय?; कंगनाचा मुख्यमंत्र्यांना सवाल

googlenewsNext

मुंबई: मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून भाषण करतोय, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजप, मोदी सरकार, कंगना राणौत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी कंगनावर केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकसेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसलेल्या इतरांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,' अशा तिखट शब्दांत कंगनानं मुख्यमंत्री ठाकरेंवर पलटवार केला आहे.



'मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? हे केवळ जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधी कोणीतरी होतं. यांच्यानंतर कोणीतरी वेगळी व्यक्ती त्यांच्या जागी असेल. ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकीचा असल्यासारखं का वागतात?' असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे.



घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, या मुख्यमंत्र्यांच्या टीकेलादेखील कंगनानं प्रत्युत्तर दिलं. 'ज्या प्रकारे हिमालयातलं सौंदर्य प्रत्येक भारतीयासाठी आहे, त्याचप्रकारे मुंबईदेखील सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी प्रत्येक भारतीयासाठी आहेत. उद्धव ठाकरे, आम्हाला लोकशाहीनं दिलेले अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करू नका. तुमची गलिच्छ भाषणं तुमची अकार्यक्षमता दाखवतात,' अशा शब्दांत कंगना मुख्यमंत्र्यांवर बरसली आहे.



काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. अनधिकृत बांधकाम मुंबईत करायची. हिंमत असेल तर पाकव्याप्त सोडा काश्मीरमध्ये अधिकृत बांधून दाखवा. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले.

याचबरोबर, मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे. छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या ते सगळ्या जगाने पाहिले असेही ते म्हणाले.

Read in English

Web Title: kangana ranaut slams cm uddhav thackeray for his dasara melava speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.