तुम्ही विकला गेला आहात...! कंगना थेट ट्विटरच्या सीईओवर बरसली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 03:32 PM2021-01-10T15:32:33+5:302021-01-10T15:33:54+5:30
कंगना कधी कोणावर बरसायची, नेम नाही. रविवारी सकाळी कंगना ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर बरसली.
कंगना कधी कोणावर बरसायची, नेम नाही. रविवारी सकाळी कंगना ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांच्यावर बरसली. कंगनाने काय केले तर जॅक डोर्सी यांचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून त्यांच्यावर मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांना विकले गेल्याचा आरोप केला. आता जॅक यांच्यावर इतका राग का तर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यामुळे.
होय, ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट अस्थायी रूपाने बंद केले. यामुळे कंगना भडकली. तिने टिष्ट्वटरचे सीईओ जॅक डोर्सी यांंचे 5 वर्षांपूर्वीचे ट्विट शोधून काढले. ‘ट्विटर अभिव्यक्ति स्वातंत्र्यासोबत आहे. सत्य बोलणा-याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,’असे ट्विट जॅक डोर्सी यांनी 5 वर्षांपूर्वी केले होते. मात्र कंगनाने त्यांच्या या ट्विट आणि एकूणच ट्विटरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तिने लिहिले, ‘तुम्ही अजिबात अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करत नाही. मुस्लिम राष्ट्र आणि चीनी खुशमस्क-यांनी तुम्हाला पूर्णपणे खरेदी केले आहे. तुम्ही फक्त फायद्यासाठी काम करता. अशा लोकांव्यतिरिक्त अन्य लोकांसोबत तुम्ही पक्षपातीपणाने वागता. तुम्ही काय तर लोभाचे गुलाम बनले आहात. पुन्हा असले दावे करू नका, हे लाजीरवाणे वाटते,’ अशा शब्दांत कंगनाने जॅक यांना सुनावले.
कंगना राणौतने याआधीही अनेकदा ट्विटरया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगपाखड केली आहे. कंगना व तिची बहीण रंगोली या दोघींच्या ट्विटर अकाऊंटविरोधातही अनेकदा ट्विटरने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे कंगनाचा ट्विटरवर विशेष राग आहे. पण दुसरीकडे या सोशल प्लॅटफॉर्मवर कंगना प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
आजीने ठोकला मानहानीचा दावा
दरम्यान कंगनावर पंजाबच्या भटिंडा येथील महिंदर कौर या आजीने मानहानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणावर उद्या 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
कंगनाने माझी तुलना अन्य एका महिलेसोबत करून माझ्यावर चुकीचे आरोप केले, असे या आजीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
कंगनाने याच आज्जीशी पंगा घेतला होता. शेतकरी आंदोलनादरम्यान या आजीवर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केले होते. दीड महिन्यांपूर्वी ही आजी शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. आंदोलनात झेंडा हाती घेतलेल्या या आजीचा फोटो शेअर करत, ‘अशा महिला 100 रूपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सामील होतात. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे’ , असे ट्विट कंगनाने केले होते.