Kangana Ranaut : आमचे पैसे परत द्या..., कंगना राणौतला 'जोर का झटका', 'थलायवी'च्या वितरकाने केली डिमांड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 03:33 PM2023-03-22T15:33:00+5:302023-03-22T15:35:16+5:30
Kangana Ranaut : दिग्गज अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यावर आधारित 'थलायवी' या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत होती.
कंगना राणौतचा 'थलायवी' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. कंगनाचा हा सिनेमा प्रदर्शित होऊन बराच काळ झाला. रिलीजआधी या सिनेमानं चांगलीच हवा केली होती. कंगनाने या सिनेमाचं जबरदस्त प्रमोशन केलं होतं. इतकंच नाही या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक कलकारांवर तिने तोंडसुख घेतलं होतं. पण प्रत्यक्षात हा सिनेमा रिलीज झाला आणि आला तसा आपटला. आता काय तर डिस्ट्रिब्युटर नुकसान भरपाईची मागणी करत आहे.
दिग्गज अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यावर आधारित 'थलायवी' या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत होती. सप्टेंबर २०२१ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात कंगनाने केलेल्या अभिनयाचं कौतुक झालं. पण कमाईच्या बाबतीत हा सिनेमा फुसका बार ठरला. अगदी आपला बजेटही हा सिनेमा वसूल करू शकला नाही. डिस्ट्रिब्युटरला यामुळे प्रचंड नुकसान सोसावं लागलं. चर्चा खरी मानाल तर आता वर्ल्डवाईड डिस्ट्रिब्युटर झीने 'थलायवी'च्या निर्मात्यांकडून ६ कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे.
वितरण कंपनीने या चित्रपटाच्या वितरण हक्कांसाठी 6 कोटी रुपये दिले होते, पण त्याचा परतावा मिळू शकला नाही. आता Zeeने प्रॉडक्शन कंपनीला पत्र पाठवून ईमेलद्वारे पैसे देण्याची मागणी केल्याचं कळतंय. चित्रपट प्रदर्शित होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने कंपनी याविरोधात न्यायालयात धाव घेऊ शकते, असंही म्हटलं जातंय.
'थलायवी' रिलीज झाल्यानंतर कंगनाने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर भडास काढली होती. 'थलायवी'ला दाद न देणाऱ्या बॉलिवूड स्टार्सवर तिने तीव्र संताप व्यक्त केला होता. 'मी बॉलिवूड माफियांची वाट पाहतेय. आशा आहेत, ते सगळे मतभेद बाजूला ठेवून एका उत्तम कलाकृतीचं कौतुक करतील. चांगल्या कलेचं कौतुक करणं इतकंही कठीण नाही...,' असं ती म्हणाली होती.