"मी कंगना राणौत लोकसभेची सदस्य म्हणून...", बॉलिवूड 'क्वीन'ने खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:31 PM2024-06-24T18:31:11+5:302024-06-24T18:33:55+5:30
लोकसभेची सदस्य म्हणून बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना राणौतने आज शपथ घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातलं संसदेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदींसह इतर नवनिर्वाचित खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली. 18 व्या लोकसभेची सदस्य म्हणून बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना राणौतने शपथ घेतली आहे.
कंगनाने शपथ ग्रहणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'आज संसद भवनात 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. जनतेची सेवा करण्याची जी संधी मला मिळाली, ती मी पुर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण रात्रंदिवस एकत्र काम करू'.
लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली, 'हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे, विरोधकांनी आपली भूमिका चोख बजावणे अपेक्षित आहे'. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिला शुभेच्छाही मिळत आहेत.
कंगना राणौतने तिच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीनंतर आता राजकारणात प्रवेश केलाय. अलीकडेच त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. कंगनाच्या समोर काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह होते. कंगनाने काँग्रेस उमेदवाराचा जवळपास 74 हजार मतांनी पराभव केला आणि तिने आपल्या राजकीय प्रवासाची चांगली सुरुवात केली.
VIDEO | "Like the PM said, the entire nation hopes that the opposition will be more responsible. Let's see what they will bring to the table," says BJP MP Kangana Ranaut (@KanganaTeam). pic.twitter.com/cxLJcUWSz5
— Press Trust of India (@PTI_News) June 24, 2024
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट इंदिरा गांधींनी 1975 मध्ये लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. अनुपम खेर, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि महिमा चौधरीसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.