कंगनाने घेतले रामलल्लाचे दर्शन, अयोध्येत पोहोचली क्वीन; शेअर केली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:58 PM2023-10-26T14:58:51+5:302023-10-26T15:12:02+5:30

कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडिया अकाऊंटवरुनही ती बिनधास्तपणे आपलं मत मांडत असते.

Kangana Ranaut takes Ramlalla's darshan in ayodhya, bollywood Queen reaches Ayodhya; Said reason | कंगनाने घेतले रामलल्लाचे दर्शन, अयोध्येत पोहोचली क्वीन; शेअर केली 'मन की बात'

कंगनाने घेतले रामलल्लाचे दर्शन, अयोध्येत पोहोचली क्वीन; शेअर केली 'मन की बात'

बॉलिवूडची क्वीन आणि प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतच्याहस्ते दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर रावण दहन करण्यात आले. यावेळी कंगनाने केशरी रंगाची ब्रोकेड बनारसी साडी परिधान करुन केसात लाल रंगाचा गजराही लावला होता. ५० वर्षांच्या इतिहासात एका महिलेकडून बाण मारून रावणाचा पुतळा जाळण्याची ही पहिलीच वेळ होती. लव-कुश समितीच्यावतीने हा रावणदहन सोहळा दसऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी, कंगनाने धनुष्यातून बाण सोडताना जय श्रीरामचा नारा दिला. त्यानंतर, आता अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीता जाऊन तिने राम लल्लाचे दर्शन घेतले. 

कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडिया अकाऊंटवरुनही ती बिनधास्तपणे आपलं मत मांडत असते. आता, तिचा आगामी ‘तेजस’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. याशिवाय 'एमर्जन्सी' सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. त्यासाठी, तिचे दौरे सुरू असून तेजस चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही कंगनाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवेत विमानप्रवास केला होता. त्यानंतर, आता अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अयोध्येतील राम जन्मभूमीचा तिच्या तेजस चित्रपटांशी संबंध असल्याचंही तिने म्हटलंय. 

कंगनाने ट्विट करुन अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. आओ, मेरे राम... तेजस्वी योद्धा, तपस्वी राजा, महान धनुर्धारी, मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे अयोध्या येथे जाऊन दर्शन घेता आले. माझ्या तेजस चित्रपटातही श्री रामजन्मभूमीची विशेष भूमिका आहे. म्हणून मनात आलं की, चला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेऊ. धन्य, भाग्य माझे... मेरे राम.. मेरे राम... असे ट्विट कंगनाने केले आहे. कंगनाने दर्शन घेतनाचा व्हिडिओही ट्विटरवरुन शेअर केला आहे. सध्या हे फोटो व्हायरल होत आहेत. 


दरम्यान, यावेळी मंदिराचे काम पूर्ण करणाऱ्या कारागिरींशी संवाद साधत, तुम्ही सर्वजण प्रभू श्रीराम यांची वानरसेना आहात, जे हे काम पूर्ण करतोय. ही ६०० वर्षांची तपस्या आणि संघर्ष आहे, जो पूर्णत्वास जाताना आपणास पाहायला मिळतोय, असेही कंगनाने म्हटले. यावेळी, कंगनाने जय श्रीराम अशी घोषणाबाजीही केली. 
 

Web Title: Kangana Ranaut takes Ramlalla's darshan in ayodhya, bollywood Queen reaches Ayodhya; Said reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.