"सुधरा नाहीतर...", गेमिंग अॅपसाठी ईडीचा समन्स मिळालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, "मलाही या जाहिरातीसाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 06:47 PM2023-10-07T18:47:30+5:302023-10-07T18:48:39+5:30
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ईडीकडून समन्स पाठविण्यात आले आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच ईडीने महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप या कंपनीवर छापेमारी केली. यामध्ये तब्बल 417 कोटी रुपये जप्त करण्यात आलं. या कंपनीने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ईडीकडून समन्स पाठविण्यात आले आहेत. रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, सनी लियोनी, राहत फते अली खान, नुसरत भरुचा यांसह १४ बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केलं आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर याबाबत स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमधून तिने महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपमुळे ईडीच्या रडारवर असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. "मलाही या जाहिरातीसाठी एका वर्षात जवळपास ६ वेळा विचारणा झाली. प्रत्येक वेळी माझ्या मानधनात काही कोटी रुपये रक्कम वाढवली जायची. पण, मी प्रत्येक वेळेस नकार दिला. हा नवीन भारत आहे. सुधरा नाहीतर सुधारलं जाईल," असं कंगनाने म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीच्या संस्थापकांपैकी एक सौरभ चंद्राकरच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला. लग्नापेक्षा जास्त तर तो इव्हेंटच झाला होता. या लग्नात बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावत परफॉर्म केले. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या कंपनीसंदर्भात ईडीने छापेमारी केली असता लग्नाच्या इव्हेंटचीही ईडीने तपासणी केली.त्यामुळे लग्नात सहभागी झालेले बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर आले.
काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरला ईडीकडून समन्स पाठवण्यात आले होते. या प्रकरणी त्याला चौकशीसाठी ६ ऑक्टोबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. रणबीर कपूरने यासंदर्भात ईडीला पत्र लिहित दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता.