तुला लाज कशी वाटत नाही? कंगनाचे ट्वीट्स वाचून संतापले सुशांत सिंग राजपूतचे चाहते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 11:19 AM2021-01-21T11:19:05+5:302021-01-21T11:19:05+5:30
आजच्या दिवशी तरी अशा नकारात्मक गोष्टी पसरवू नकोस, अशा शब्दांत चाहत्यांनी कंगनाचा क्लास घेतला.
सुशांत सिंग राजपूतचा आज वाढदिवस. सुशांत आज आपल्यात नाही. पण आज जगभरातील चाहते त्याच्या स्मृतींना उजाळा देत आहेत. सोशल मीडियावर पुन्हा एकदा सुशांतचे नाव ट्रेंड करतेय. अशात अभिनेत्री कंगना राणौतनेही सुशांतच्या वाढदिवशी काही ट्वीट्स केलेत. मात्र तिच्या पोस्ट पाहून सुशांतचे चाहते भडकले.
कंगनाचे पहिले ट्वीट...
प्रिय सुशांत, मुव्ही माफियांनी तुला बॅन केले, त्रास दिला. सोशल मीडियावर तू अनेकदा मदत मागितलीस आणि मला दु:ख आहे की, मी त्याक्षणी तुझी मदत करू शकले नाही. तू स्वत: माफियांना पुरून उरण्याची ताकद ठेवतोस, असे मी समजायला नको होते. काश... हॅपी बर्थ डे... असे ट्वीट कंगनाने केले.
दुसरे ट्वीट
यानंतर कंगनाने दुसरे ट्वीट केले. त्यात तिने लिहिले, ‘यशराज फिल्म्सने बॅन केल्याचे सुशांत म्हणाला होता, हे कधीही विसरू नका. करण जोहरने त्याला मोठमोठी स्वप्नं दाखवलीत आणि नंतर त्याचे सिनेमे डम्प केलेत. यानंतर हेचलोकसुशांत फ्लॉप अॅक्टर असल्याचा कांगावा करत सुटले. महेश भट्टची स्वत:ची सारी मुलं डिप्रेस्ड आहे, तरीही तो सुशांत परवीन बाबीसारखा मरेन, असे म्हणाला होता. या सर्वांनी मिळून सुशांतला मारले. सुशांतने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर हे सगळे सांगितले होते. याचा कदापि विसर पडू देऊ नका.’
तिसरे ट्वीट
यानंतरही कंगनाने आणखी एक ट्वीट केले. ‘याऊपरही सुशांतचा वाढदिवस आयुष्याचा सण म्हणून साजरा करा. तुम्ही चांगले नाहीत, हे म्हणण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका. स्वत:शिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. ड्रग्ज हेच समस्येवरचे उत्तर आहे असे म्हणणा-या आणि तुम्हाला मानसिक व आर्थिकदृष्ट्या लुबाडणा-यांकडे सोडून द्या,’ असे ती या ट्वीटमध्ये म्हणाली.
चाहते भडकले...
कंगनाच्या या ट्वीटने सुशांतचे चाहते भडकले. त्यांनी कंगनाचा चांगलाच समाचार घेतला. सुशांत असा कधीही बोलला नव्हता. आजच्या दिवशी तरी अशा नकारात्मक गोष्टी पसरवू नकोस, अशा शब्दांत त्यांनी कंगनाचा क्लास घेतला. सुशांतच्या मृत्यूवर तू खूप राजकारण केलेस, तुला लाज वाटत नाही का? अशा शब्दांत एका चाहत्याने कंगनावर निशाणा साधला.
हिला अजिबात लाज वाटत नाही, तेव्हाच एका मृतात्म्याच्या नावावर पब्लिसिटी मिळवू पाहतेय, अशा शब्दांत एका चहतीने संताप व्यक्त केला. आज आमच्या सुशांतचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी तर काही चांगले शब्द बोल, असे एका चाहत्याने लिहिले.