‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही...’ म्हणत कंगना स्वत:च बनली दिग्दर्शक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 10:37 AM2021-06-25T10:37:28+5:302021-06-25T10:40:37+5:30
कंगना राणौत आता पुन्हा एकदा दिग्दर्शन करताना दिसणार आहे. साई कबीर यांना ऐनवेळी बाहेरचा रस्ता दाखवत तिने स्वत: दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
सतत कुणाशी तरी पंगा घेणारी कंगना राणौत (Kangana Ranaut)आता पुन्हा एकदा दिग्दर्शन करताना दिसणार आहे. होय, माझ्याशिवाय आणीबाणीचा काळ कोणाला कळू शकत नाही, माझ्याशिवाय आणीबाणी उत्तमरित्या कोणीच दिग्दर्शित करू शकणार नाही, असे म्हणत कंगना तिच्या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: खांद्यावर घेतली आहे.
कंगना राणौत लवकरच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत झळकणार आहे. (Kangana Ranaut will direct Indira Gandhi’s Emergency )
या सिनेमाचे दिग्दर्शक ‘रिव्हॉल्व्हर रानी’ फेम दिग्दर्शक साई कबीर करणार होते. पण कदाचित साई कबीर यांच्या दिग्दर्शनावर कंगनाला विश्वास नसावा. ऐनवेळी तिने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि स्वत: दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली.
कू’वर एक पोस्ट लिहित कंगनाने याबाबत घोषणा केली. माझ्याशिवाय आणीबाणीचा काळ कोणाला कळूच शकत नाही असा दावा तिने या पोस्टमध्ये केला.
‘मी पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात उतरते आहे, याचा आनंद आहे. आणीबाणी जवळपास वर्षभरापासून अभ्यास केल्यावर, माझ्याशिवाय या सिनेमाला दुसरा कोणीच न्याय देऊ शकत नाही,असे मला वाटले. लेखक रितेश शाह सध्या पटकथेवर काम करतेय. या चित्रपटासाठी मला अभिनयाशी संबधित कामांच्से बलिदान द्याव लागले तरी देखील माझी तयारी आहे,’ अशा आशयाची पोस्ट कंगनाने लिहिली आहे.
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर या चित्रपटाशी संबंधित काही व्हिडीओही शेअर केले आहेत. यात ती इंदिरा गांधीच्या भूमिकेची तयारी करताना दिसतेय. कंगनाने याआधी ‘मणिकर्णिका’चे दिग्दर्शन केले होते.
येत्या काळात कंगनाचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला तिचा ‘थलायवी’ हा सिनेमा बनून तयार आहे. पे्रक्षक त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याशिवाय धाकड, तेजस या सिनेमातही कंगना दिसणार आहे.