तिसरं मुलं जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा...! वाढत्या लोकसंख्येवर कंगना राणौतचे ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:36 AM2021-04-21T11:36:40+5:302021-04-21T11:38:01+5:30
पुन्हा एकदा कंगना तिच्या एका ट्विटने चर्चेत आली आहे.
कंगना राणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा एक वादग्रस्त ट्विट केले आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी कठोर कायदा बनवावा, असे मत व्यक्त करतानाच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत तिने विधान केले. तिसरे मुलं जन्मास घालणा-यांना तुरुंगात डांबा अथवा त्यांच्यावर दंड ठोका, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे. (Kangana Ranaut angry over increasing population)
काय म्हणाली कंगना?
लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे. मतांचे राजकारण खूप झाले. हे खरे आहे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बळजबरीने लोकांची नसबंदी केली आणि यामुळे त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पुढे त्यांची हत्याही करण्यात आली. पण आज भारतातील वाढती लोकसंख्या एक संकट आहेत. हे लक्षात घेता काही नियम-कायदे लागू करायला हवेत. तिसरे अपत्य जन्मास घालणा-यांवर दंड ठोकायला हवा किंवा काही काही वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी, असे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अन्य एका ट्विटमध्ये ती म्हणते, देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोक मरत आहेत. कागदोपत्री 130 कोटी भारतीयांसह देशात 25 कोटींपेक्षा अधिक अवैध स्थलांतरित आहेत. जे दुस-या देशातून येऊन भारतात स्थायिक झाले आहेत.
कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहे. अभिनेत्रीच्या या ट्विटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी तिला पाठींबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे़
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती थलायवी या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय धाकड आणि तेजस हे तिचे सिनेमेही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.