कंगना राणौत पुन्हा एकदा वादात; ‘मेंटल है क्या’च्या सेटवरून येत आहेत या बातम्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 10:28 AM2019-06-07T10:28:22+5:302019-06-07T10:29:27+5:30
कंगना राणौतचा चित्रपट येतोय आणि वाद होणार नाहीत, असे शक्यच नाही. सध्या ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात बिझी आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कंगनाने वाद ओढवून घेतला आहे.
कंगना राणौतचा चित्रपट येतोय आणि वाद होणार नाहीत, असे शक्यच नाही. सध्या ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात बिझी आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कंगनाने वाद ओढवून घेतला आहे. खरे तर ‘मेंटल है क्या’चे पोस्टर रिलीज झाले तेव्हापासूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. पण ताजा वाद हा कंगनाशी निगडीत आहे.
होय,‘मणिकर्णिका’ या चित्रपटाप्रमाणे ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाचेही काही सीन्स कंगनाला आवडले नसल्याचे कळतेय. हे सीन्स नव्याने शूट व्हावेत, अशी तिची इच्छा आहे. त्यामुळे कंगनाने ‘मेंटल है क्या’चा दिग्दर्शनाचा जिम्मा स्वत:च्या खांद्यावर घेतल्याचे कळतेय. अर्थात ‘मेंटल है क्या’चे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुदी यांनी या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे.
एसियन एजने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाने चित्रपटाचे काही फुटेज बघितले. पण तिला ते आवडले नाहीत. कंगनाच्या मते, तिचा चित्रपटातील को-स्टार राजकुमार रावला तिच्यापेक्षा अधिक सीन्स मिळाले आहेत. त्यामुळे काही सीन्स नव्याने शूट करण्याची कंगनाची इच्छा आहे. आता खरे काय हे ठाऊक नाही. पण ‘मेंटल है क्या’चे डायरेक्टर मात्र असे काहीही नसल्याचा दावा करत आहेत.
आम्ही कुठल्याही वादांशिवाय चित्रपट शूट केला. कंगना आणि राजकुमार या दोघांनी यात उत्तम काम केले आहे. चित्रपटाबद्दल पसरवण्यात येत असलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाबद्दलही असेच झाले होते. शूटींग पूर्ण झाल्यावर या चित्रपटातील काही सीन्स नव्याने शूट करण्याचा निर्णय कंगनाने घेतला होता. शिवाय यापश्चात चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. यावरून बराच वाद झाला होता.
‘मेंटल है क्या’या चित्रपटानंतर कंगना ‘पंगा’ या चित्रपटात झळकणार आहे.