आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:44 IST2025-01-09T14:43:52+5:302025-01-09T14:44:59+5:30
अभिनेत्री कंगना राणौत हिने मोठा निर्णय घेतला आहे.

आता कानाला खडा! कंगना राणौतनं घेतला मोठा निर्णय, म्हणते, "यापुढे कोणताही राजकीय…"
Kangana Ranaut on Political Movie : अभिनेत्री कंगना राणौतच्या(Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency )सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान कार्यकाळातील आणीबाणीवर आधारित या चित्रपटामध्ये कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. खरं तर हा सिनेमा गेल्या वर्षी २०२४ मध्ये रिलीज होणार होता. परंतु सिनेमाविषयी वाद कोर्टात गेल्याने सिनेमाचं प्रदर्शन थांबलं. काही बदल आणि काही सीन्सला कात्री लावल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दिला. कदाचित यामुळेच कंगनाने आता यापुढे राजकीय चित्रपट बनवणार नाही असा निर्णय घेतला आहे.
कंगनाने नुकतंच 'न्यूज १८'ला मुलाखत दिली. यावेळी तिनं म्हटलं की, "मी पुन्हा कधीही राजकीय चित्रपट (Political Movie) बनवणार नाही. ते बनवणे खूप कठीण आहे. आता मला समजलं की बरेच लोक असं का करत नाहीत. अनुपम खेर यांनी 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' मध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. हे त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे. पण जर तुम्ही मला विचाराल तर मी पुन्हा कधीही ते करणार नाही".
कंगनाने स्वत: सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. त्यामुळे 'इमर्जन्सी' चित्रपट बनवताना तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. ती म्हणते, "सेटवर मी कधीही माझा राग गमावला नाही. जर तुम्ही निर्माता असाल तर तुम्ही कोणावर रागावाल? दिग्दर्शक म्हणून तुम्ही निर्मात्याशी भांडू शकता. पण जर दोन्ही तुम्ही असाल तर कोणाशी भांडणार?"
कंगना पुढे म्हणाली, "माझ्याकडे आंतरराष्ट्रीय कर्मचारी होते. त्यांचे करार कडक होते आणि त्यांना दर आठवड्याच्या अखेरीस पैसे हवे होते. त्यामुळं चित्रीकरण झालं असो वा नसो मला त्यांना पैसे द्यावे लागले. त्यानंतर आसाममध्ये पूर आला. माझ्यासमोर इतरही अनेक समस्या होत्या, ज्या मी हाताळत होतो. हा चित्रपट बनवण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मला असहाय्य वाटत होतं. मला निराशा वाटली. याचा सर्वाधिक फटका कुटुंबाला विशेषतः तिची बहीण रंगोलीला सहन करावा लागला". दरम्यान, 'इमर्जन्सी' हा सिनेमा येत्या १७ जानेवरी रोजी प्रदर्शित होणार आहे.