कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 06:40 AM2021-09-21T06:40:06+5:302021-09-21T06:41:02+5:30
कंगना दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे अख्तर यांचे वकील जय भानुशाली यांनी म्हटले.
मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानी दाव्यावरील सोमवारच्या सुनावणीस अखेरीस बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने हजेरी लावली. गेल्या आठवड्यात न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्याची तंबी दिल्यानंतर कंगनाने अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली.
कंगना दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे अख्तर यांचे वकील जय भानुशाली यांनी म्हटले. न्यायालयाने दाव्यावरील पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी ठेवली असून कंगनाच्या अर्जावरील सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी १ ऑक्टोबर रोजी घेणार आहेत.
खटला अन्य कोर्टात..
कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी या मानहानी दाव्यावरील सुनावणी अन्य काेर्टात वर्ग करण्यास मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्याची माहिती अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांना सोमवारी दिली.
कंगना रनौतचा न्यायालयावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्यासाठी तिने अर्ज केला आहे.
त्याशिवाय कंगना हिने अख्तर यांच्याविरोधात खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे, अशीही माहिती सिद्दिकी यांनी न्यायालयाला दिली.