रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:36 IST2024-12-10T13:35:56+5:302024-12-10T13:36:12+5:30
दिल्लीला पंतप्रधानांना जाऊन भेटण्याचं काय आहे खास कारण?

रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार
हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांची १०० वी जयंती आहे. हा दिवस खूप खास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब दिल्लीला रवाना झालं आहे. रणबीर कपूर, आलिया भट, नीतू कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, आदर जैन यांची कलिना विमानतळावर झलक दिसली. पारंपरिक वेषात सर्व दिल्लीला निघाले आहेत.
आरके फिल्म्सने फिल्म हेरिटेज फाऊंडेशन, एनएफडीसीस एनएफएआय अँड सिनेमाज सोबत मिळून एका उत्सवाचं आयोजन केलं आहे. 'राज कपूर १०० - सेलिब्रेटिंग द सेंटेनरी ऑफ द ग्रेटेस्ट शोमॅन' असं कार्यक्रमाचं नाव आहे. १३ ते १५ डिसेंबर असे तीन दिवस हा कार्यक्रम होणार आहे. यादरम्यान ४० शहरांतील तब्बल १३५ थिएटरमध्ये राज कपूर यांचे १० सिनेमे दाखवले जातील. तसंच या सिनेमांच्या तिकीटाची किंमत केवळ १०० रुपये असणार आहे. पीव्हीआर-आयनॉक्स आणि सिनेपोलिस प्रिमियम हॉल्समध्ये 'आग', 'बरसात', 'आवारा', 'श्री ४२०', 'जागते रहो', 'जिस देश मे गंगा बहती है', 'संगम', 'मेरा नाम जोकर', 'बॉबी' आणि 'राम तेरी गंगा मैली' सिनेमांचा समावेश आहे.
कपूर कुटुंब कलिना विमानतळावर दाखल झालं ते व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. आलिया भटने लाल साडी नेसली आहे ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. तर रणबीर सूट-बूटमध्ये डॅशिंग दिसत आहे. करीना कपूरने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर सैफ अली खानने व्हाईट कुर्ता, पँट आणि जॅकेट घातलं आहे.
राज कपूर यांनी आपल्या ५० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक दमदार सिनेमे केले. त्यांच्या सिनेयुगातील योगदानाची दखल घेत त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ फिल्मफेअर अवॉर्ड, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले आहे.