Karan johar Birthday Special : करण जोहरचे होते या अभिनेत्रीवर प्रेम, आज ही अभिनेत्री आहे एका सुपरस्टारची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 02:23 PM2019-05-25T14:23:25+5:302019-05-25T14:24:26+5:30
करण जोहरच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते.
करण जोहरचा आज म्हणजेच २५ मे ला वाढदिवस असून त्याने आज बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. धर्मा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा यश जोहर यांचा करण हा मुलगा असून त्याने आज एक प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक अशी आपली ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करणने दिग्दर्शक अथवा निर्माता म्हणून नव्हे तर एक अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. दूरदर्शन वरील इंद्रधनुष या मालिकेत त्याने श्रीकांत ही भूमिका साकारली होती.
राज कपूर, यश चोप्रा, सुरज बडजात्या यांच्या कामाचा त्याच्यावर खूपच प्रभाव होता. त्यामुळेच त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्राकडे दिलवाले दुल्हनिया ये जाएंगे या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिथेच तो चित्रपट निर्मितीतील अनेक बारकावे शिकला आणि कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या दिग्दर्शकीय करियरला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्याला पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने कभी खुशी कभी गम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले.
करण जोहरच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. त्याने अद्याप लग्न केले नसले तरी त्याला सरोगसीद्वारे दोन मुले असून यश आणि रुही अशी त्यांची नावे आहेत. करण जोहरचे एकेकाळी एका अभिनेत्रीवर प्रचंड प्रेम होते आणि त्यानेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये कबूल देखील केली होती.
करण आणि ट्विंकल खन्ना एकाच शाळेत शिकत होते. लहानपणापासूनच त्यांची खूप चांगली मैत्री होती. करणला ट्विंकल खूप आवडायची आणि त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. ही गोष्ट अक्षय कुमारला देखील माहीत असून यावरून त्याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात करणची टर देखील उडवली होती.
कुछ कुछ होता है या करणच्या पहिल्या चित्रपटात टीना ही भूमिका ट्विंकल खन्नाने साकारावी असे करणला वाटत होते. पण ट्विंकलने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ट्विंकलला सगळे टीना या नावानेच हाक मारत असल्याने त्याने या चित्रपटातील नायिकेचे नाव टीना ठेवले होते.