'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:29 AM2024-05-06T08:29:36+5:302024-05-06T08:58:56+5:30
Karan johar: करणला बऱ्याचदा नेटकऱ्यांनी, इंडस्ट्रीतील लोकांना विविध कारणांमुळे ट्रोल केलं आहे. परंतु, यावेळी झालेलं ट्रोलिंग त्याच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळेच त्याने पोस्ट शेअर केली आहे.
करण जोहर (karan johar) या नावाचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा आहे. आजवरच्या कारकिर्दीत करणने अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले आहेत. त्यामुळे त्याची कायम कलावर्तुळात चर्चा रंगतांना दिसते. मात्र, फिल्मी करिअरमुळे चर्चेत येणाऱ्या करणला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आजवर अनेकदा तो ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. मात्र, एक ट्रोलिंग तिच्या जिव्हारी लागलं होतं. एका कार्यक्रमात त्याची खिल्ली उडवली होती. ज्यामुळे तो प्रचंड दु:खी झाला होता.
करणला बऱ्याचदा नेटकऱ्यांनी, इंडस्ट्रीतील लोकांना विविध कारणांमुळे ट्रोल केलं आहे. पूर्वी त्याला या गोष्टींचा राग यायचा आणि तो जाहीरपणे त्याचा राग व्यक्तही करायचा. परंतु, आता त्याला राग येण्याऐवजी वाईट वाटू लागलं आहे. नुकतीच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाला करण?
"मी माझ्या आईसोबत टीव्ही बघत बसलो होतो. त्याचवेळी माझ्या मी एका रिअॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. एका तथाकथित लोकप्रिय चॅनेलवर हा प्रोमो होता. एक कॉमिक आर्टिस्ट अत्यंत वाईट पद्धतीने माझी मिमिक्री करत होता. ट्रोलर्सकडून या गोष्टी घडणं मी समजू शकतो. किंवा मग ते लोक जे त्यांची ओळख, चेहरा लपवून असं ट्रोल करतात. पण, जो माणूस २५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून इंडस्ट्रीत काम करतोय त्याच माणसाची खिल्ली इंडस्ट्रीमधूनच उडवली जाते. तुमचे हावभाव कसे आहेत हे त्या मिमिक्रीमधून दाखवले जातात. पण, आता मला या गोष्टीचा राग अजिबात येत नाहीत. त्याऐवजी आता मला वाईट वाटतं या सगळ्याचं, असं करणने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सोनी टीव्हीवर अलिकडेच मॅडनेसम मचाएंगे या कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला होता. या प्रोमोमध्ये कॉमेडियन केतन सिंहने करण जोहरची मिमिक्री केली. ज्यामुळे करण नाराज झाला आहे. केतनने करणच्या कॉफी विथ करण या शोची मिमिक्री केली. यात त्याने टॉफी विद चूरण असं म्हणत करण आणि त्याच्या शोची खिल्ली उडवली. तसंच करण ज्या पद्धतीने बोलतो किंवा डान्स करतो याचीही त्याने नक्कल केली.