करिना कपूरलाही आवडतो वरण भात, पोस्ट करत म्हणाली, "हा पदार्थ खाल्ल्यावर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 15:18 IST2023-08-29T15:14:31+5:302023-08-29T15:18:07+5:30
समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा पदार्थ कोणता तर उत्तर येईल वरण भात.

करिना कपूरलाही आवडतो वरण भात, पोस्ट करत म्हणाली, "हा पदार्थ खाल्ल्यावर..."
बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) पंजाबी कुटुंबात जन्माला आली आहे. गोरे गोबरे गाल, घारे डोळे, चेहऱ्यावर ग्लो असाच करिनाचा कायम लुक राहिला आहे. पंजाबी कुटुंबातील मुलीचा असतो अगदी तसाच. करिनाला खाण्याची खूप आवड आहे हे तिच्या अनेक पोस्टमधून लक्षात येतं. पण तिला महाराष्ट्रीयन पदार्थांचीही भुरळ पडली आहे हे नुकतंच तिच्या पोस्टवरुन समोर आलंय.
समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा पदार्थ कोणता तर उत्तर येईल वरण भात. प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबात गरम गरम वरण भात, त्यावर तुपाची धार आणि लिंबू असा बेत असतोच. पण करिना कपूरही वरण भात खात असेल यावर कोणाचा विश्वासही बसला नसता. सहसा अभिनेत्री फीट राहण्यासाठी भात खाणं टाळत असतील असाच अनेकांचा समज आहे. पण करिनाचं डाएट वेगळं आहे. ती सात्विक आणि पौष्टिक खाण्यावर भर देते. नुकतेच तिने दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर कायम दिसतो तसा ग्लो दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले, 'वरण भात खाल्ल्यानंतरचा लुक कसा दिसत असेल तर असा...'
करिनाच्या या पोस्टवर अनेक वरण भात लव्हर्सने कमेंट केल्या आहेत. वरण भात खाल्ल्यावर करिनाच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो पाहून सर्वांनीच तिच्या लुकची तारीफ केली आहे. प्रसिद्ध डाएटिशियन ऋजुता दिवेकरकडूनच करिना कपूर टीप्स घेते. मध्यंतरी करिना आणि करिष्मा दोघी बहिणींनी ऋजुता दिवेकरच्या घरी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेतला होता. करिनाच्या 'झिरो फिगर' लुकमागेही ऋजुता दिवेकरची कल्पना होती.