करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 05:41 PM2024-05-11T17:41:04+5:302024-05-11T17:41:55+5:30
करीनाला कोर्टाने नोटीस पाठवली आहे.
अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) तिच्या एका पुस्तकामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. जुलै २०२१ मध्ये करीनाने तिच्या मातृत्वाचा अनुभव सांगणारं 'करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल' लिहिलं होतं. मात्र आता पुस्तकाच्या याच नावामुळे ती ३ वर्षांनी अडचणीत आली आहे. एका वकीलाने पुस्तकाच्या नावात बायबलचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी करीनाला कोर्टाने नोटीस पाठवली आहे.
'करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल' या नावात 'बायबल' शब्द असल्याने ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. जबलपूर सिविल लाइन निवासी क्रिस्तोफर अँथोनी यांनी उच्च न्यायालयात करीना कपूरविरोधात याचिका दाखल केली. तिच्यावर केस दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यांनी म्हणलं आहे की, "करीनाने स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठी हे पुस्तक लिहिले.पुस्तकाच्या कव्हरवर बायबल शब्द वापरणं चूक आहे. या पुस्तकावर बॅन आणा.' अँथोनी यांच्या याचिकेनंतर न्यायाधीश गुरपाल सिंह अहलूवालिया यांच्या खंडपीठाने करीनाला नोटीस पाठवली आहे. तसंच पुस्तक विक्रेत्यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. १ जुलै रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
2021 मध्ये करीना कपूरच्या या पुस्तकाचं अनावरण झालं होतं. यामध्ये अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नंसीचा प्रवास वर्णन केला होता. तसंच नवोदित मातांसाठी मदरहुड आणि बाळाची काळजी घेण्यासाठी काही टीप्सही दिल्या आहेत. मातांसाठी डाएट, फिटनेस, सेल्फ केअर आणि नर्सरी तयार करण्याचेही टीप्स देण्यात आले आहेत.