करीना कपूर ग्लॅमरस नव्हे तर डिटेक्टिव्ह भूमिकेत, आगामी 'द बर्किंघम मर्डर्स' चा ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 17:22 IST2024-09-03T17:21:42+5:302024-09-03T17:22:59+5:30
सिनेमात ती तिच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी आहे. म्हणूनच हा सिनेमा तिच्यासाठी खास असल्याचं ती म्हणाली होती.

करीना कपूर ग्लॅमरस नव्हे तर डिटेक्टिव्ह भूमिकेत, आगामी 'द बर्किंघम मर्डर्स' चा ट्रेलर आऊट
करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) 'द बर्किंघम मर्डर्स' (The Buckingham Murders) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हंसल मेहता दिग्दर्शित या सिनेमात करीनाचा कधीही न पाहिलेला अभिनय पाहायला मिळणार आहे. आतपर्यंत करीनाने ग्लॅमरस, लव्हस्टोरी अशाच भूमिका केल्या. पण या सिनेमात ती तिच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी आहे. म्हणूनच हा सिनेमा तिच्यासाठी खास असल्याचं ती म्हणाली होती.
'द बर्किंघम मर्डर्स' हा क्राइम थ्रिलर सिनेमा आहे. बर्किंघमशायर मध्ये १० वर्षांच्या मुलाची हत्या होते आणि हे कोणी केलं याभोवती कहाणी फिरते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्याची जबाबदारी करीनावर असते. करीना कपूरने सिनेमात जास्मिन भामरा नावाच्या डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. तिने आपल्या लूकने चाहत्यांना प्रभावित केलं आहे. बालाजी मोशन पिक्चर्सने युट्यूबवर ट्रेलर पोस्ट केला आहे. हंसल मेहता यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे एकता कपूरसोबत करीना कपूरनेही निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.
करीना कपूरने याआधी एकता कपूरच्या 'क्रू','वीरे दी वेडिंग' मध्ये काम केलं आहे. तर हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची तिची पहिलीच वेळ आहे. १३ सप्टेंबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात करीनाशिवाय रणवीर बरार, एश टंडन, रुक्की नाहर आणि कपिल रेडेकर यांच्याही भूमिका आहेत. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी BFI LONDON FILM FESTIVAL मध्ये सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं.