Raveena Tandon : “त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या त्या वादावर रवीना टंडन स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:19 PM2023-02-17T13:19:09+5:302023-02-17T13:19:16+5:30
Raveena Tandon, Karishma Kapoor : असं म्हणतात की, करिश्मा व रवीनाच्या वादाचं खरं कारण अजय देवगण होतं. दोघीही अजय देवगणच्या प्रेमात वेड्या होत्या.
‘अंदाज अपना अपना’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. सलमान खान, आमिर खान, करिश्मा कपूर (Karishma Kapoor ) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) अशी लीड स्टार कास्ट असलेल्या या सिनेमात करिश्मा व रवीनाची घट्ट मैत्री दाखवली होती. अर्थात पडद्यावर. पडद्यामागे काय तर, दोघी एकमेकींच्या पक्क्या 'वैरिणी' होत्या. होय, सेटवर दोघीही एकमेकींशी एक शब्दही बोलत नव्हत्या.
या वादाची सुरूवात झाली होती 'आतिशः फील द फायर' या सिनेमाच्या सेटवर. असं म्हणतात की, या चित्रपटाच्या एका गाण्याचं शूट सुरू होतं आणि अचानक रवीना व करिश्माचं कडाक्याचं भांडण सुरू झालं. इतकं की, दोघींही एकमेकींना आपआपल्या विगने मारणं सुरू केलं. हा वाद तेव्हा बराच गाजला होता. तेव्हापासून दोघीत बिनसलं ते बिनसलं. इतक्या वर्षानंतरही दोघीतला हा वाद कायम आहे. आता एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रवीना पुन्हा एकदा त्या वादावर बोलली.
काय म्हणाली रवीना...?
“माझ्या आयुष्यात तिचं तसं कोणतंच स्थान नाही. मी प्रोफेशनल आहे आणि मला काही फरक पडत नाही. आज करिश्मा कपूरसोबत पोझ दिल्याने मी काही सुपरस्टार होणार नाही. गरज पडली तर मी झाडूसोबत फोटोसाठी पोझ देईन. करिश्मा आणि माझ्यात मैत्री वगैरे काही नाही. हेच अजयसोबतही (अजय देवगण) आहे. अर्थात प्रोफेशनली मी त्या दोघांसोबतही काम करण्यास तयार आहे. काम करताना मला कोणतीच अडचण नाही,” असं रवीना म्हणाली.
तिने मला चार चित्रपटांमधून काढून टाकलं...
1997 मध्ये रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत रवीना करिश्मा कपूरबद्दल बोलली होती. अर्थात तिने तिचं नाव घेतलं नव्हतं. “मी त्या अभिनेत्रीचं नाव घेणार नाही. मात्र माझ्यामुळे तिला फार असुरक्षित वाटायचं. तिने मला चार चित्रपटांमधून काढून टाकायला लावलं होतं. मला तिच्यासोबत एका चित्रपटात काम करायचं होतं. पण ती निर्माते आणि अभिनेत्यांच्या जवळची होती. त्यामुळे गोष्टी बदलल्या. मात्र असे खेळ मी खेळत नाही,”असं ती म्हणाली होती.
अजय देवगणमुळे झालं होतं भांडण?
असं म्हणतात की, करिश्मा व रवीनाच्या वादाचं खरं कारण अजय देवगण होतं. दोघीही अजय देवगणच्या प्रेमात वेड्या होत्या. रवीना व अजय यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. याचदरम्यान अजयची व करिश्माची जवळीक वाढू लागली आणि अजयने रवीनाशी ब्रेकअप केलं. मग काय, इथूनच दोघींमध्ये कॅट फाईट सुरू झाली.