ऋषी कपूर यांची अमेरिकेत भेट घेतली या खास व्यक्तींनी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:52 PM2019-03-19T14:52:07+5:302019-03-19T14:53:32+5:30
आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर लवकरच मुंबईत परतणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या पण ते या महिन्यात तरी मुंबईत परतणार नसल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी खंबीरपणे सामना करत आहेत. ऋषी कपूर यांचे भाऊ अभिनेते रणधीर कपूर आणि त्यांची मुलगी अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या ऋषी आणि नीतू कपूर यांच्यासोबत अमेरिकेला आहेत. नीतू कपूर यांनीच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर रणधीर, करिश्मा, ऋषी आणि त्यांचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर सगळ्यात चांगली भावंडं... त्यांचे कधीही संभाषण हे केवळ खाण्याच्या बाबतीत असते असे कॅप्शन लिहिले आहे. नीतू कपूर यांनी पोस्ट केलेल्या या फोटोवर ऋषी सर तुमची तब्येत लवकर बरी होवो अशा शुभेच्छा त्यांच्या फॅन्सनी दिल्या आहेत.
रणधीर कपूर तीन आठवड्यांसाठी अमेरिकेला गेले असून तिथे ते ऋषी आणि नितू यांच्यासोबत राहाणार आहेत. ऋषी यांची बहीण रिमा जैनदेखील ऋषी यांना भेटायला काही दिवसांपूर्वी अमेरिकेला गेली होती. रिमा अमेरिकेतून भारतात परतल्या असल्याचे नीतू यांनीच इन्टाग्रामद्वारे सांगितले होते. त्यांनी ऋषी कपूर, रिमा जैन आणि त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
ऋषी कपूर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांवर ते चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या ट्रीटमेंटला अजून काही वेळ लागणार असल्याचे म्हटले गेले होते. ऋषी भारतात परतणार कधी याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.