‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करा, अन्यथा...; करणी सेनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:34 AM2022-03-22T10:34:52+5:302022-03-22T10:35:34+5:30
The Kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची देशभर चर्चा सुरू असताना आता करणी सेनेने (Karni Sena ) एक वेगळीच भूमिका घेतली आहे.
The Kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची देशभर चर्चा सुरू असताना आता करणी सेनेने (Karni Sena ) एक वेगळीच भूमिका घेतली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करावी, जेणेकरून ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी वापरता येईल, असं आवाहन मागणी करणी सेनेने केलं आहे.
‘द ट्रिब्यून’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. गेल्या 16 मार्चला चंदीगडमध्ये एका कार्यक्रमात करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल सिंह अमू यांनी ही विनंती केली.
बहुतेक राज्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते (झी स्टुडिओ)आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुढे येऊन चित्रपटाच्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करावी. जेणेकरून ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरता येईल. निर्मात्यांनी चित्रपटात काश्मिरी पंडितांचं जे दु:ख पडद्यावर दाखवलं आहे, त्याच काश्मिरी पंडितांसोबत ते खांद्याला खांदा लावून उभे आहेत, असा संदेश यातून जाईल, असे करणी सेनेचे प्रमुख सूरज पाल अमू म्हणाले.
‘द काश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांनी असं करण्यास नकार दिला तर, त्यांनी हा चित्रपट फक्त काश्मिरी पंडितांची व्यथा दाखवून पैसा कमावला, असं मानलं जाईल. असं असेल तर करणी सेनेने लोक हा चित्रपट पाहणार नाही, असेही सूरज पाल सिंग अमू म्हणाले.
Sir Niyaz Khaan Sahab, Bhopal aa raha hoon 25th ko. Please give an appointment so we can meet and exchange ideas how we can help and how you can help with the royalty of your books and your power as an IAS officer. https://t.co/9P3oif8nfL
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 20, 2022
याआधी मध्य प्रदेशचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनीही अशा प्रकारची मागणी केली होती. नियाज खान यांनी आपल्या एका ट्विटमध्ये, ‘द काश्मीर फाईल्स’ची कमाईतील काही भाग काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या घरावर खर्च केल्यास बरं होईल, अशा आशयाचं ट्विट केलं होतं. विशेष म्हणजे, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या या ट्विटला लगेच उत्तरही दिलं होतं. नियाज खान साहेब 25 तारखेला भोपाळला येत आहेत. मला भेटा म्हणजे आपण सविस्तर बोलू, असं त्यांनी म्हटलं होतं.
चित्रपटाची कमाई
‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईबद्दल बोलायचं तर या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 167.45 कोटींचा गल्ला जमवला आहे. रविवारी या चित्रपटाने 26.20 कोटींची कमाई केली. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा गाठेल, असं मानलं जात आहे.