Kartik Aaryan : -तर माझं अख्खं करिअर संपलं असतं..., कार्तिक आर्यनचं ‘ते’ विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 01:49 PM2022-09-02T13:49:04+5:302022-09-02T13:50:55+5:30
Kartik Aaryan : आमिर खान, अक्षय कुमारसारखे स्टार्स बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले असताना कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’ सिनेमानं दमदार कमाई केली. साहजिकच, तेव्हापासून कार्तिक जाम चर्चेत आहे. या यशानं कार्तिक जाम खूश्श आहे. पण सोबत प्रेशरही मोठं आहे...
या वर्षात आलेले बॉलिवूडचे बहुतेक सर्व सिनेमे आपटले. अपवाद फक्त कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाचा. आमिर खान, अक्षय कुमारसारखे स्टार्स बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले असताना कार्तिकच्या सिनेमानं दमदार कमाई केली. साहजिकच, तेव्हापासून कार्तिक जाम चर्चेत आहे. या यशानं कार्तिक जाम खूश्श आहे. पण सोबत प्रेशरही मोठं आहे. होय, सध्या कार्तिककडे चार मोठे सिनेमे आहेत. पण यासोबत 100 टक्के देण्याचा दबावही त्याच्यावर आहे. याचं कारण आहे इंडस्ट्रीत आऊटसाईडर असणं.
फिल्म कंपॅनिअनला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक यावर बोलला. माझा एकही सिनेमा फ्लॉप झाला असता तर माझं करिअर संपलं असतं. कारण इंडस्ट्रीत माझा कोणीही गॉडफादर नाहीये. मला सपोर्ट करणारा इथे कोणीही नाही. माझी काळजी घेणारा, माझ्यावर लक्ष देणारी एकही व्यक्ती इंडस्ट्रीत नाही, असं कार्तिक म्हणाला.
त्यानंतर कोणीच मला काम देणार नाही...
स्टारकिड्स याबद्दल काय विचार करतात मला माहित नाही. पण एक आऊटसाइडर या नात्याने मला हे चांगलं ठाऊक होतं की,एकही फ्लॉप दिला तर माझं करिअर इथेच संपेल. मग माझ्यासोबत कोणीच चांगले प्रोजेक्ट्स करणार नाहीत. एक आऊटसाइडर या नात्याने फ्लॉप देणं ही खूप मोठी जोखीम आहे. मला पाठिंबा देणारं किंवा आधार देणारं कोणीच नाही. त्यामुळे आगामी काळात माझ्यावर कामाचं बरंच प्रेशर आहे, असं तो म्हणाला.
कार्तिकने स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. यासाठी त्याने मोठा स्ट्रगल केला. स्ट्रगल काळात कार्तिकने खूप काही भोगलं. आज कार्तिकचे लाखो चाहते आहेत. पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य सगळं काही आहे, पण काही वर्षांआधी असं काहीही नव्हतं. अलीकडे एका मुलाखतीत कार्तिकने आपल्या स्ट्रगल काळातील अनेक कटू आठवणी शेअर केल्या होत्या.
‘मी इंडस्ट्रीत आलो, तेव्हा माझ्याकडे कार नव्हती. दोन चित्रपट केल्यानंतर मी पहिली कार खरेदी केली होती. ती सुद्धा थर्ड हँड कार होती. 60 हजार रूपयांची ती कार खरेदी करण्यासाठी सुद्धा मला ब-याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या कारच्या दरवाज्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. पण तरिही मी ती कार घेतली. कारण मी रिक्षा, बाईकवरून किंवा मग लोकांना लिफ्ट मागून इव्हेंटमध्ये जायचो. मी ती गाडी खासकरून रेड कार्पेटवर जाण्यासाठी घेतली होती. पण त्या गाडीचा ना दरवाजा उघडायचा, ना ती ठीक चालायची. इतकंच नाही तर पावसात ती कार लीकेजही व्हायची. पाऊस आल्यावर ड्रायव्हरची सीट ओली होत होती कारण वर छतामधून पाणी टपकत होतं. पण नंतर मला त्याची सवय झाली होती. कुणाकडून लिफ्ट घेण्यापेक्षा माझी ही कार बरी, असं मला वाटायचं,’ असं तो म्हणाला होता.