Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 10:56 AM2023-11-21T10:56:42+5:302023-11-21T10:56:58+5:30
'कॉफी विथ करण'मध्ये साराने कार्तिकबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करताना ब्रेकअपवरही मौन सोडलं होतं. आता यावर कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे.
'कॉफी विथ करण ८'च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अनन्या पांडे आणि सारा अली खानने हजेरी लावली होती. या शोमध्ये अनन्या आणि साराने त्यांच्या लव्ह लाइफबद्दलही अनेक खुलासे केले. सारा खानचं नाव बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबरोबरही जोडलं गेलं होतं. 'कॉफी विथ करण'मध्ये साराने कार्तिकबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करताना ब्रेकअपवरही मौन सोडलं होतं. आता यावर कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे.
करण जोहरने साराला "कार्तिक आर्यनबरोबर मैत्री करणं सोपं होतं का?" असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना सारा "हे नेहमी सोपं नसतं," असं म्हणाली होती. पण, दोघांमधील रिलेशनशिपबाबत असं उघडपणे बोलणं कार्तिकला मात्र खटकलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने यावर भाष्य केलं आहे. "मला वाटतं की नातं दोन लोकांचं असेल तर त्यावर तिसऱ्या व्यक्तीने बोललं नाही पाहिजे. सगळ्यांनी आपल्या नात्याचा आदर केला पाहिजे," असं कार्तिक फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
पुढे कार्तिक म्हणाला, "मी कोणाबरोबरही माझ्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलेलं नाही. कोणाच्या नात्याबाबत बोलणं बरोबर नाही. माझी स्वत:कडूनही हिच अपेक्षा असते. कधी कधी ते नातं टिकत नाही. पण, जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा असा विचार कधीच करत नाही. मला वाटतं की आपण स्वत:चा आणि त्या चांगल्या क्षणांचाही आदर केला पाहिजे. तुम्ही जेव्हा याबाबत तिसऱ्या व्यक्तीशी बोलता तेव्हा तो केवळ तुमचाच नाही तर दुसऱ्या व्यक्तीबाबतही विचार करत असतो."
दरम्यान, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सत्यप्रेम की कथा या चित्रपटातून कार्तिक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्याने कियारा अडवाणीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. कार्तिकने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.