करवा चौथचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये 49 वर्षांपासून! नक्की कशी झाली सुरूवात?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:50 PM2023-10-31T12:50:25+5:302023-10-31T12:55:19+5:30
बॉलिवूडमध्ये करवा चौथ साजरा करण्याचा हा ट्रेंड कसा सुरू झाला माहितेय? तर आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वटपौर्णिमा हा सण थाटात साजरा केला जातो, त्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये करवा चौथला महत्त्व आहे. बॉलिवूड आणि करवा चौथचं खास नातं आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांत करवा चौथ हा सण दाखवण्यात आला आहे. मोठ्या थाटामाटात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी करवा चौथचा सण साजरा करतात. बॉलिवूडची करवा चौथची गाणी या सणाची मजा आणखीनच वाढवते. पण बॉलिवूडमध्ये करवा चौथ साजरा करण्याचा हा ट्रेंड कसा सुरू झाला माहितेय? यामागे कुणाचा हात होता माहितेय? तर आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
होय, 49 वर्षांपूर्वी 1964 मध्ये 'बहू बेटी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पहिल्यांदा करवा चौथ हा सण साजरा करताना दाखवण्यात आला होता. या चित्रपटात करवा चौथ पहिल्यांदा साजरी करण्यात आली आणि त्यावर एक गाणेही चित्रीत करण्यात आले. गाण्याचे नाव होते 'आज है करवा चौथ सखी'. आशा भोसले यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर अभिनेत्री माला सिन्हा आणि मुमताज या गाण्यात दिसल्या होत्या. गाण्यात सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना पाहायला मिळाल्या.
हा चित्रपट टी प्रकाश राव यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये अशोक कुमार, माला सिन्हा, जॉय मुखर्जी, मेहमूद आणि मुमताज यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. हा चित्रपट स्त्रीभिमुख होता, ज्यामध्ये माला सिन्हाने शांता नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. जी स्वातंत्र्य आणि सन्मानासाठी समाजाविरुद्ध उभी राहते.
तेव्हापासून बॉलिवूडमध्ये हा ट्रेंड सुरू आहे. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये करवा चौथवर गाणी बनवली गेली आहेत, जी प्रेक्षकांना खूप आवडतात. त्या गाण्यांद्वारे तुम्ही तुमचा करवा चौथ आणखी खास बनवू शकता. यंदा करवा चौथ हा सण १ नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. हे व्रत सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पाळले जाते.