अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परततोय हा प्रसिद्ध अभिनेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 15:35 IST2021-04-12T15:33:41+5:302021-04-12T15:35:39+5:30
या अभिनेत्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परततोय हा प्रसिद्ध अभिनेता
कसोटी जिंदगी की या मालिकेतील सिझान खानने साकारलेली अनुराग बासू ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेला आज अनेक वर्षं होऊनही त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सिझान गेली कित्येक वर्षं छोट्या पडद्यापासून दूर आहे. तो दोन वर्षांपूर्वी यै है मोहोब्बते या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार होता. त्याने या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरणही केले होते. पण काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडली. त्यानंतर काही महिन्यांनी तो आणखी एका मालिकेत झळकणार असल्याची चर्चा होती. पण प्रोडक्शन हाऊससोबत चर्चा केल्यानंतर कमबॅकसाठी ती भूमिका योग्य नसल्याचे सिझानला वाटले. त्यामुळे त्याने ही मालिका न करण्याचा विचार केला होता. पण आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याला छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
शक्ती अस्तित्व की एहसास की या मालिकेत सिझान दिसणार असून त्याची जोडी रुबिना दिलाईकसोबत जमणार आहे. रुबिनाला नुकतेच बिग बॉसचे विजेतेपद मिळाले असून त्यामुळे ती प्रचंड खूश आहे. या मालिकेत सिझान हरमनच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका त्याच्याआधी वीवीयान डिसेनाने साकारली होती. ही भूमिका प्रचंड आवडल्यानेच या मालिकेत मी काम करण्याचा विचार केला असे सिझान सांगतो.
कलर्स टीव्हीने त्याच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून सिझानच्या कमबॅकविषयी सांगितले आहे. सिझानच्या कमबॅकमुळे त्याचे चाहते प्रचंड खूश आहेत.