300 रुपये घेऊन सुपरस्टार व्हायला निघालेला KGF चा Yash; 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी ऐकून येईल डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 02:05 PM2022-01-09T14:05:37+5:302022-01-09T14:06:34+5:30
Yash:२०१८ मध्ये 'केजीएफ-1' मध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला.विशेष म्हणजे KGF मुळे त्याला तुफान लोकप्रियता मिळाली.
दाक्षिणात्य सुपरस्टार यश हे नाव आजच्या घडीला कोणत्याही प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. KGF मुळे यश खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. यशचा आज कलाविश्वात मोठा दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे केवळ साऊथच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. उत्तम अभिनयासोबत आपल्या लक्झरी लाइफ स्टाइल ओळखल्या जाणाऱ्या यशने एकेकाळी प्रचंड हालाखीत दिवस काढले आहेत. विशेष म्हणजे केवळ ३०० रुपये खिशात घेऊन यश सुपरस्टार व्हायला निघाला होता. परंतु, मेहनतीच्या जोरावर त्याने त्याचं नशीब चमकावलं. त्यामुळेच सुपरस्टार असलेल्या यशचा स्ट्रगल काळ कसा होता ते पाहुयात.
नवीन कौर गौडा (Naveen Kumar Gowda) असं यशचं खरं नाव असून २००५ त्याने छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर Jambada Hudugi या कन्नड चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मात्र, त्याला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली. नाही. त्यानंतर २०१८ मध्ये 'केजीएफ-1' मध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला.विशेष म्हणजे KGF मुळे त्याला तुफान लोकप्रियता मिळाली. आज यश कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीत त्याने त्याच्या स्ट्रगलवर भाष्य केलं आहे.
३०० रुपये घेऊन सुपरस्टार व्हायला निघाला होता यश
कर्नाटकातील एका लहानशा गावात लहानाचा मोठा झालेल्या यशने सुरुवातीच्या काळात प्रचंड स्ट्रगल केला. एकेकाळी खिशात केवळ ३०० रुपये घेऊन तो नशीब आजमावण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरातून बाहेर पडल्यावर त्याने बंगळुरु गाठलं आणि त्याचा खऱ्या अर्थाने स्ट्रगल सुरु झाला.
"मला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. शाळेत असताना सुद्धा मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो, अभिनयही करायचो. शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचो. पण, त्यावेळी स्टारडम काय असतो हे मला माहित नव्हतं. मी फक्त माझ्या स्वप्नांचा पाठलाग करत होतो. मला माझ्या स्वप्नांवर आणि स्वत:वर पूर्ण विश्वास होता", असं यश म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मी अभिनेता होऊ नये अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. परंतु, मी आई-वडिलांचा विरोध केला आणि पाकिटात केवळ ३०० रुपये घेऊन सुपरस्टार व्हायला निघालो. त्यावेळी मी बंगळुरुला पोहोचलो पण हा प्रवास किती खडतर आहे याची जाणीव झाली. पण, मी थिएटर जॉइन केलं. त्यामुळे मला अभिनयातील वेगवेगळे बारकावे जवळून पाहता आले. मला टिव्ही मालिकांमध्ये काम करायचं नव्हतं. थेट हिरो व्हायचं होतं. पण, आयुष्य तुम्हाला दरवेळी काही ना काही शिकवत असतं. कालांतराने माझे कुटुंबीय बंगळुरुला आले आणि मला त्यांच्यासाठी पैसे कमवायचे होते. यात मी माझ्या कमाईतील काही पैसे घरखर्चाला आणि काही पैसे स्वत:साठी ठेवत होतो. याच काळात मला चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या आणि माझा रुपेरी पडद्यावरचा प्रवास सुरु झाला."
दरम्यान, २००८ मध्ये Moggina Manasu या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत झळकला होता. परंतु, यात त्याने सहकलाकाराची भूमिका साकारली होती. याच वर्षी त्याचा 'रॉकी' चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो रातोरात प्रकाशझोतात आला. विशेष म्हणजे केजीएफमध्येही त्याच्या भूमिकेचं नाव रॉकी होतं. त्यामुळे आज अनेक जण त्याला रॉकी याच नावाने हाक मारतात.